

बंगळूर : एआय तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वच क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. काहीवेळा एआय कॅमेराच्या चुकांमुळे मोठा दंड आकारला जात आहे. बंगळूरमध्ये याची प्रचिती आली आहे.
रहदारी नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी लावलेल्या एआय कॅमेऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एका दुचाकीस्वाराला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. दुचाकीस्वारांना पाठीवर घेतलेल्या गिटारवर हेल्मेट न घातल्याबद्दल एआय कॅमेऱ्याने त्याला दंड ठोठावला आहे.
सौविक दत्ता नावाची एक व्यक्ती स्कूटरवरून हेब्बाळहून जात होती. त्यावेळी त्याने आपल्या पाठीवर गिटार घेतली होती. एआय कॅमेऱ्याने पाठीवरील गिटारला माणूस समजून हेल्मेट न घातल्याबद्दल त्याला दंड ठोठावला आहे. त्या दुचाकीस्वाराला फोटोसह चलन ऑनलाईन पाठवण्यात आले आहे. एआय कॅमेऱ्याने केलेली चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.