

Parliament Monsoon Session
नवी दिल्ली ः लोकसभेत आज (सोमवार 28 जुलै) दुपारपासूनच ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सरकारी पक्षातील मंत्र्यांसह काही खासदार आणि इतर विविध पक्षांचे खासदार आपापले म्हणणे मांडत आहे. याच दरम्यान, सायंकाळी लोकसभेत बोलताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विरोधकांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यावर गृहमंत्री अमित शहा यांचा संताप झाला. विरोधक सतत मध्ये मध्ये बोलून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून शहा संतापले. आणि त्यानंतर त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.
ट्रम्प यांनी भारतावर सीजफायर करण्याबाबत दबाव टाकला का? या मुद्यावरून जयशंकर बोलत असताना विरोधकांनी दंगा करायला सुरवात केली. त्यावेळी जयशंकर हे ट्रम्प यांनी 22 एप्रिल ते 17 जून या काळात पहलगाम हल्ल्यानंतर कधी फोन केला, कधी सहानभूती दर्शवली याबाबत सांगत होते. पण विरोधकांनी बसूनच बोलणे सुरू केले.
तेव्हा संपालेल्या गृहमंत्री अमित शहांनी थेट उभे राहून अध्यक्षांना आवाहन केले की, भारत देशाचा शपथ घेतलेले परराष्ट्र मंत्री येथे बोलत आहे. त्यावर तुम्हाला (विरोधकांना) विश्वास नाही. त्यांना कुठल्यातरी इतर देशावर विश्वास आहे.
मी समजू शकतो की त्यांच्या पक्षात विदेशाचं महत्व किती आहे. (सोनिया गांधी यांचं विदेशी मूळ हा संदर्भ येथे असल्याचे बोलले जात आहे) पण याचा अर्थ हा नाही की, त्यांनी पक्षाच्या सगळ्या गोष्टी सभागृहात घेऊन यावं.
शहा म्हणाले की, भारताच्या विदेश मंत्र्यांवर विश्वास ठेवणार नाही का? शपथ घेतलेला मंत्री येथे बोलत आहे. ते एक जबाबदार पदावर आहे. अध्यक्ष महोदय म्हणूनच ते (विरोधी पक्ष) तिकडे बसले आहेत आणि आणखी 20 वर्षे तिकडेच बसतील.
त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा चीनबाबत बोलत असताना विरोधकांनी जयशंकर यांच्या बोलण्यात जागेवरच बसून बोलून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही अमित शहांनी हस्तक्षेप केला.
अमित शहा म्हणाले की, माननीय अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षातील कोणी बोलत असतात तेव्हा आम्ही पूर्ण धीराने ते ऐकतो. काल खूप काही खोटं बोललं गेलं आहे. पण ते असत्यदेखील आम्ही हलाहल समजून पिऊन टाकले. पण आता हे (विरोधक) सत्यदेखील ऐकू शकत नाहीएत. माननीय अध्यक्षांनी प्रोटेक्शन दिले पाहिजे.
बसल्या जागी बोलून टिका टिपण्णी करणे सगळ्यांना येते. असं नाही की आम्हाला असं करता येत नाही. पण जेव्हा एखाद्या गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे, तेव्हा परराष्ट्र मंत्र्यांना बसल्याबसल्या टीका टिपण्णी करणे हे विरोधी पक्षांना शोभते का? माननीय अध्यक्ष तुम्ही विरोधकांना अगदी आग्रहाने शांतता राखण्यास सांगावे नाहीतर आम्हालाही नंतर आमच्या सदस्यांना समजावता येणार नाही.
दरम्यान, लोकसभेचे कामकाज आज रात्री 12 पर्यंत चालवण्यास सर्वांनी मान्यता दिली. कदाचित त्यानंतरही वेळ वाढवला जाऊ शकतो.