

Jharkhand Naxal Attack
झारखंड: झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. पलामू रेंजचे डीआयजी नौशाद आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक मनातू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केदल परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजता सुरू झाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर जखमी जवानाला मेदिनीराय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, डालटनगंज येथे दाखल करण्यात आले आहे.
झारखंडमध्ये नक्षलवादी संघटना तृतीय सम्मेलन प्रस्तुति समिति (TSPC) हा प्रतिबंधित भाकपा (माओवादी) संघटनेचा एक फुटीर गट असून तो या भागात सक्रिय आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की टीएसपीसीचा झोनल कमांडर शशिकांत गंझू हा आपल्या गावात केदल करमा पर्वानिमित्त येणार आहे. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित आहे. या माहितीनुसार पोलिसांनी विशेष शोध मोहीम हाती घेतली. पोलिस पथक गावाच्या जवळ पोहोचताच नक्षलवाद्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर शशिकांत गंझू आणि त्याच्या टोळीने अचानक गोळीबार सुरू केला, पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
गोळीबारात तीन जवान जखमी झाले. त्यांना तात्काळ मेदिनीराय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्यापैकी संतन कुमार आणि सुनील राम या दोन जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यापैकी एक जवान हा पलामूचे एएसपी यांचा अंगरक्षक होता. तिसऱ्या जखमी जवानाची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत. चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. तसेच आसपासच्या गावांमध्ये कडक नजर ठेवण्यात येत आहे.