

First Made In India Semi Conductor Chip
नवी दिल्ली: देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण आला आहे. देशात तयार झालेली पहिली सेमीकंडक्टर चिप ‘विक्रम’ 32-बिट प्रोसेसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आली. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये ‘सेमिकॉन इंडिया 2025’ च्या उद्घाटनप्रसंगी ही महत्त्वपूर्ण चिप पंतप्रधानांना सुपूर्द केली.
यावेळी बोलताना रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव म्हणाले, "काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे 'इंडिया सेमीकंडक्टर मिशन' सुरू झाले. केवळ साडेतीन वर्षांत जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे. सध्या भारतात पाच सेमीकंडक्टर युनिट्सचे काम वेगाने सुरू आहे आणि आज आम्ही पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप पंतप्रधान मोदींना दिली आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत स्थिरता आणि विकासाचे प्रतीक बनला आहे."
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सेमीकंडक्टर लॅबने विकसित केलेला विक्रम 32-बिट प्रोसेसर हा भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आहे. प्रक्षेपण यानांसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीतही तो योग्यरित्या काम करू शकतो.
सेमीकंडक्टर हे आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र आहेत. आरोग्य, वाहतूक, दळणवळण, संरक्षण आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रांसाठी ते महत्त्वाचे आहेत. डिजिटलीकरण वाढत असताना, सेमीकंडक्टर देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि धोरणात्मक स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत. 2021 मध्ये ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM)’ सुरू झाल्यानंतर चार वर्षांतच भारताने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. या मिशनला पाठिंबा देण्यासाठी सरकारने 76 हजार कोटी रुपयांची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना जाहीर केली होती. त्यापैकी सुमारे 65 हजार कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत.
डिजाइन, पॅकेजिंग आणि उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर भारत आत्मनिर्भर बनत आहे. डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजनेअंतर्गत 23 चिप डिझाइन प्रकल्पांना स्टार्टअप्स आणि नवसंशोधकांना मदत करण्यासाठी मंजुरी दिली गेली आहे. ‘वर्वसेमी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स’ सारख्या कंपन्या संरक्षण, हवाई क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा प्रणालीसाठी प्रगत चिप्स तयार करत आहेत. जून 2023 मध्ये गुजरातमधील साणंद येथे पहिली सेमीकंडक्टर युनिट सुरू करण्यास मंजुरी मिळाली. आतापर्यंत गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये एकूण 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या घडामोडी भारताला केवळ सेमीकंडक्टरचा ग्राहक नाही तर एक जागतिक निर्माता बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.