

palak paneer controversy
वॉशिंग्टन : जेवणात आणलेल्या पालक पनीरचा वास येतो, या कारणावरून झालेल्या भेदभावाविरुद्ध कायदेशीर लढाई लढणाऱ्या दोन भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत मोठा विजय मिळवला आहे. अमेरिकेतील 'युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर' या विद्यापीठातील भारतीय पीएचडी विद्यार्थी आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य यांनी पालक पनीरशी संबंधित भेदभावाच्या घटनेवरून नागरी हक्कांच्या खटल्यात १.८ कोटी रुपये (२००,००० डॉलर्स) नुकसानभरपाई मिळवली आहे.
'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर' या विद्यापीठात आदित्य प्रकाश आणि त्यांच्या पत्नी उर्मी पीएचडी करत होते. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी हे विभागातील मायक्रोवेव्हमध्ये आपले जेवण गरम करत होते. एका कर्मचाऱ्याने जेवणाच्या "वासाचे" कारण देत त्यांना तिथे जेवण गरम करण्यास मज्जाव केला. "हा फक्त अन्नाचा वास आहे, मी जेवण गरम करून लगेच जात आहे," असे आदित्य यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या साध्या संवादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले.
आदित्य आणि उर्मी यांनी आरोप केला की, त्यांनी या भेदभावाविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा विद्यापीठाने त्यांच्यावरच सूडबुद्धीने कारवाई करण्यास सुरुवात केली. ३४ वर्षीय आदित्य यांना वरिष्ठ प्राध्यापकांसोबत वारंवार बैठकींना बोलावून, त्यांच्यामुळे कर्मचारी "असुरक्षित" अनुभवत असल्याचे सांगण्यात आले.३५ वर्षीय उर्मी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या 'टीचिंग असिस्टंट' पदावरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर, पालक पनीरच्या घटनेनंतर दोन दिवस मुद्दाम भारतीय जेवण जेवल्यामुळे त्यांच्यावर "दंगल भडकवल्याचा" धक्कादायक आरोपही ठेवण्यात आला.
अखेर या संपूर्ण प्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार आदित्य आणि उर्मी यांनी यांनी केला. त्यांनी कोलोरॅडो येथील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टात विद्यापीठाविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला. त्यांनी आरोप केला की, प्रकाश यांनी "भेदभावपूर्ण वागणुकीबद्दल" चिंता व्यक्त केल्यानंतर, विद्यापीठाने सूडबुद्धीने कारवाई केली. अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये विद्यापीठाने या दोघांना १.८ कोटी रुपये देण्याचे आणि त्यांची 'मास्टर्स' पदवी प्रदान करण्याचे मान्य केले. मात्र, या तडजोडीनुसार त्यांना भविष्यात या विद्यापीठात शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे दाम्पत्य नुकतेच भारतात परतले आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये, भट्टाचार्य यांनी या अनुभवावर भाष्य करताना लिहिले की, "हा लढा माझ्या आवडीचे अन्न खाण्याच्या स्वातंत्र्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी होता. माझ्या त्वचेचा रंग किंवा माझा भारतीय उच्चार यामुळे माझा स्वाभिमान कमी करण्याचा प्रयत्न झाला, पण मी अन्यायासमोर कधीही झुकणार नाही."दुसरीकडे, विद्यापीठाने तडजोड केल्याची पुष्टी केली असली तरी, आपल्यावर असलेले भेदभावाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नियमांनुसारच सर्व प्रक्रिया राबवल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.
ही बातमी व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांच्या कौतुक केले आहे. "भारतीय अन्नाचा वास हा आमच्यासाठी सुगंध आहे," अशा शब्दांत अनेकांनी परदेशातील वर्णभेदी मानसिकतेवर टीका केली आहे, तर काहींनी हा विजय "पालक पनीर" खाऊन साजरा करणार असल्याचे इन्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.