

Pakistani Warship Collides INS Ship: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर आता जरी तणावपूर्ण शांतता असली तरी समुद्रात मात्र पाकिस्तान भारतीय नौसेनेची कळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. १५ सप्टेंबर रोजीच्या सायंकाळी उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौसेनेची एक फ्रंटलाईन युद्धनौका आणि पाकिस्तानच्या नौसेनेचे एक जहाज यांची टक्कर झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी नौसेनेचे हे जहाज समुद्रात मॅन्युवरिंग करत आगाऊपणा करत होतं. भारतीय युद्धनौका आपली नियमित गस्त घालत होते त्यावेळी पाकिस्तानी जहाज धोकादायकरित्या भारतीय युद्धनौकेच्या जवळ आलं. वॉर्निंग देऊनही ते थांबले नाहीत अन् दोन जहाजांची टक्कर झाली. भारतानं ही घटना गांभिर्याने घेतली असून परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित पाकिस्तानच्या डिप्लोमॅट्सला बोलवून घेत कडक शब्दात विरोध नोंदवला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौसेनेची एक फ्रंडलाईन युद्धनौका अरबी सुमद्रात आपली नियमित गस्त घालत होती. त्यावेळी पाकिस्तानी नौसेनेचे जहाज वेगाने भारताच्या युद्धनौकेच्या जवळ आलं. पाकिस्तानी जहाजाने धोकादायक असं मॅन्युरिंग केलं. दोन्ही जहाजांमध्ये पाहिजे तेवढं अंतर राखलं गेलं नाही. त्यामुळं त्या दोघांची टक्कर झाली.
सध्याच्या घडीला दोन्ही युद्धनौकांची नावे आणि टक्कर नेमकी कुठं झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या टक्करीत मोठं नुकसान झालेलं नाही. मात्र तरी देखील भारतानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय समुद्र हद्दीत दोन्ही देशांच्या युद्धनौकांना एकमेकांनी सुरक्षित अंतरावरून येणं जाणं ठेवावं यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात याआधीच करार झाला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कार्यकारी राजदूतांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी पाकिस्तानी नौसैनिकांचे हे कृत्य स्विकारण्यासारखं नाही. त्यांचे हे वर्तन भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९९१ च्या युद्धाभ्यास आणि नौसेनेच्या संचलनाबाबतच्या करारातील कलम १० चे सरळ सरळ उल्लंघन असल्याचं सांगितलं.