

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) बैठकीचे आयोजन करत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधानांव्यतिरिक्त शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या इतर नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आतापर्यंतचे संबंध आणि परिस्थिती पाहिल्यास पंतप्रधान मोदी इस्लामाबादला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत ते या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या मंत्र्याला पाठवतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाकिस्तान १५-१६ ऑक्टोबरला या बैठकीचे आयोजन करणार आहे. युरेशियन गटातील राज्य प्रमुखांच्या परिषदेनंतर कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) ही दुसरी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. मोदी हे राज्य प्रमुखांच्या शिखर परिषदेला नियमित उपस्थित राहिले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कझाकस्तानमधील शिखर परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बिश्केकला गेले होते. दरम्यान, या बैठकीसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना दिलेल्या निमंत्रणावर भारत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तानला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या, ज्यांनी २०१५ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती.
एप्रिल १९९६ मध्ये एक बैठक झाली. त्यात चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांनी भाग घेतला. जातीय आणि धार्मिक तणाव दूर करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे हा या बैठकीचा उद्देश होता. तेव्हा त्याला 'शांघाय फाइव्ह' म्हटले जायचे. परंतू संघटनेची खऱ्या अर्थाने स्थापना १५ जून २००१ रोजी झाली. त्यानंतर चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' (SCO) ची स्थापना केली. यानंतर जातीय आणि धार्मिक तणाव दूर करण्याबरोबरच व्यवसाय आणि गुंतवणूक वाढवणे हेही उद्दिष्ट बनले.
१९९६ मध्ये शांघाय फाइव्हची स्थापना झाली तेव्हा चीन आणि रशियाच्या सीमेवरील तणाव टाळण्यासाठी आणि त्या सीमा कशा सुधारता येतील हा त्याचा उद्देश होता. कारण त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या देशांमध्ये तणाव होता. अवघ्या तीन वर्षांत हे उद्दिष्ट साध्य झाले. त्यामुळे ती सर्वात प्रभावी संस्था मानली जाते.