

Pahalgam Terror Attack
श्रीनगर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी एक चकमक झाली. यात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. तर या चकमकीत एलईटीचा टॉप कमांडर दहशतवादी अल्ताफ लल्ली याचा खात्मा करण्यात आला.
बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळी भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या बांदीपोरा येथील कुलनार अजस परिसरात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथे चकमक सुरु आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांना बांदीपोरा येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनची माहिती देण्यात आली. ते येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील (LoC) अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.