

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानातील नेते बिलावल भुट्टो यांचे अधिकृत एक्स खाते बंद केले. यापूर्वी भारताने पाकिस्तान सरकारचे संकेतस्थळ आणि एक्स हँडल, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे एक्स हँडल भारतात बंद केले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारचे एक्स हे सोशल मीडिया हँडल भारतात दिसणार नाही. त्यांची कोणतीही पोस्टही दिसणार नाही.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स आणि अधिकृत संकेतस्थळ भारतात बंद करण्यात आले. त्यापाठोपाठ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तसेच भारताविरुद्ध पोकळ वलग्ना करणारे पाकिस्तानातील नेते बिलावल भुट्टो यांचेही एक्स हॅण्डल बंद करण्यात आले. त्यापूर्वी नवाज शरीफ यांच्या युट्यूब चॅनलसह पाकिस्तानातील काही वृत्तवाहिन्या आणि अन्य असे १६ युट्यूब चॅनलही बंद करण्यात आले आहेत.