

Red Fort temple terror alert:
नवी दिल्ली: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आणि प्रमुख मंदिरांना लक्ष्य करण्याच्या दहशतवादी कटाचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि बांगलादेशातील कट्टरपंथी गटांशी संबंध असल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी राजधानीत हाय अलर्ट जारी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांपैकी सहा जणांना तामिळनाडूतील उथुकुली, पल्लाडम आणि थिरुमुरुगनपुंडी या भागांतून ताब्यात घेण्यात आले, तर इतर दोघांना पश्चिम बंगालमधून पकडण्यात आले. 'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जण बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता आहे. या सर्वांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात येत आहे.
देशभर घातपाती कारवाया करण्याची योजना आखणाऱ्या एका मॉड्यूलबाबत गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, "डझनभर मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत." या डिजिटल साहित्याचे विश्लेषण करून त्यांचे जाळे आणि परदेशी हँडलर्सचा शोध घेतला जात आहे. हा गट सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता आणि त्यांनी कथितपणे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. यातील चार आरोपी एका आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान दिल्लीत आले होते, जिथे त्यांनी मेट्रो स्टेशनवर 'फ्री काश्मीर'चे पोस्टर्स लावले होते आणि त्यानंतर ते पुन्हा तामिळनाडू व पश्चिम बंगालला परतले.
तपासादरम्यान, केवळ तामिळनाडूतील ठिकाणांहून ८ मोबाईल फोन आणि १६ सिम कार्ड जप्त करण्यात आले. संशयित आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी बनावट आधार कार्डांचा वापर करत होते आणि गारमेंट उद्योगात काम करत होते.
लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने प्रमुख धार्मिक स्थळांना निशाण्यावर ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. लाल किल्ला आणि चांदनी चौक परिसरातील काही भाग संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदनी चौक परिसरातील एक मंदिर लक्ष्य असू शकते आणि हा गट आयईडी स्फोटाचा कट रचत असावा असा संशय आहे. हा कट ६ फेब्रुवारी रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या मशिदीतील स्फोटाचा बदला घेण्याच्या प्रयत्नांशी संबंधित असल्याचे मानले जाते. नोव्हेंबर २०२५ मध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील वारसा स्थळे आणि मंदिरांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.