

Operation Sindoor
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मध्यरात्री हवाई हल्ले करुन ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्याच्या बदला म्हणून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत ही कारवाई केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर'नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ही कारवाई होणारच होती. ही अभिमानाची गोष्टी असल्याची प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला आणि कमी वेळात लक्ष्यांवर हल्ला केल्याबद्दल पीएम मोदींनी सशस्त्र दलांच्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीत, हा एक नवीन भारत असल्याचे नमूद केले.
भारताने अवघ्या २५ मिनिटांत केलेल्या जलद आणि समन्वित हल्ल्यात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. बालाकोटनंतरचा सीमापार करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM), लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि हिजबुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ८० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले असून ४६ जण जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
“पहलगाम हल्ला हा भारतमातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. देश शोकसागरात बुडालाय; पण ज्यांनी हा कट रचला आहे, त्यांना कल्पनेपेक्षाही कठोर शिक्षा दिली जाईल," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. दरम्यान, बुधवारी (दि. ७ मे) पहाटे भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही कठोर शिक्षा दिली. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये अवघ्या २४ मिनिटांत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठीच 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.