

Rampur Head Constable demand to send him to border in letter to SP
लखनौ : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रामपूर जिल्ह्यातील एका हेड कॉन्स्टेबलने आपल्या देशप्रेमाचा अनोखा प्रत्यय दिला आहे.
रामपूर पोलिस लाइनमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल चमन सिंह यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांना एक पत्र सादर करत, स्वतःला पाकिस्तान सीमेवर युद्धासाठी पाठवण्याची विनंती केली आहे.
चमन सिंह यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. देशासाठी बलिदान द्यायची तयारी आहे.
जर श्रीमानजींची परवानगी असेल, तर कृपया मला पाकिस्तान बॉर्डरवर पाठवावे. मी AK-47, SLR आणि INSAS रायफल चालवू शकतो.”
चमन सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत आपली इच्छा स्पष्ट केली. या व्हिडिओमध्ये त्यांनी आवर्जून सांगितले की ते देशासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहेत. माझी देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आहे.
जर युद्धाची वेळ आली, तर मी मागे हटणार नाही. मला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण आहे, आणि मी सीमेवर जाऊन शत्रूशी सामना करण्यास तयार आहे.”
चमनसिंह हे उत्तरप्रदेशतील अमरोहा जिल्ह्यातील रजबपुरचे रहिवासी आहेत. सीतीपूर येथे 2011 मध्ये त्यांची प्रथम नियुक्ती झाली होती. सध्या ते रामपूर पोलिस लाईन येथे तैनात आहेत.
त्यांचे वडील विजयवीर सिंह हे शेतकरी आहेत. काका कृष्णवीर सिंह आर्मीमध्ये मेजर सूभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. आजोबा बालकराम सिंह हे शाळेचे मुख्याध्यापक होते. आई राजवीरी देवी गृहिणी आहेत.
2010 मध्ये चमनसिंह यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना जिल्हा पोलिस प्रमुख विद्यासागर मिश्र म्हणाले, “कोणीही थेट आर्मीमध्ये जाऊ शकत नाही. आर्मीमध्ये जाण्याची एक ठरलेली प्रक्रिया असते.
पोलिस दलातून थेट युद्धात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्याची सध्या गरज नाही आणि परिस्थितीही तशी नाही.”
हेड कॉन्स्टेबल चमन सिंह यांची भावना अनेकांना भारावून टाकणारी असली तरी संरक्षण दलात सामील होण्यासाठी ठरावीक प्रक्रिया आणि शिस्तबद्ध पद्धतींचं पालन गरजेचं आहे.