

Pakistan MP Shahid Khattak on Operation Sindoor and India-Pakistan Conflict
इस्लामाबाद : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेचा सूर अधिकच चढला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी (9 मे 2025) गदारोळ पाहायला मिळाला.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे खासदार शाहिद खटक यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरीफ हे बुझदिल (भित्रे) आहेत. मोदींचे नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही... असे खासदार शाहिद खटक म्हणाले.
खासदार शाहिद खटक यांनी भाषणादरम्यान थेट टीपू सुलतान यांचा दाखला देत म्हटलं की, "जर लष्कराचा सरदार सिंहासारखा शूर असेल, तर कोल्ह्यासारखे सैनिकही सिंहांसारखे लढतात. पण जर नेता कोल्ह्यासारखा बुझदिल असेल, तर सिंहासारखे सैनिकही पराभूत होतात."
खा. खटक यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना ‘बुझदिल’ आणि ‘गीदड़’ (कोल्हा) असे संबोधत प्रश्न केला की, "असा नेता जो भित्रा आहे आणि पाकिस्तानचं नाव घेण्याचं धाडसही करत नाही, तो सीमारेषेवर सैनिकांना लढण्याचा संदेश काय देणार? पाकिस्तानच्या टॉप लीडरशिपमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भीती आहे. मोदींचं नाव घ्यायलाही ही मंडळी घाबरतात," असा आरोप त्यांनी केला.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारतीय सैनिकी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याच्या सजगतेमुळे ही योजना फसली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून एलओसी (LOC) परिसरात सलग दोन दिवस ड्रोन हल्ले व स्फोट झाले आहेत.
भारतानं पाकिस्तानमधील लाहोर, इस्लामाबाद, कराचीसारख्या शहरांना टारगेट केले आहे. सीमेलगतच्या सर्व भारतीय शहरांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.
पाक संसदेत सलग दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात टीकेचा भडिमार झाला.
देशाच्या संरक्षण धोरणावर, लष्कराच्या तयारीवर आणि पंतप्रधानांच्या निर्णयक्षमतेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफसह इतर विरोधी पक्षही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.
पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला भारताच्या तडाखेबंद प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ आणि लष्करी तयारीवर संशय व्यक्त केला जात आहे.