

Pakistan Defence Minister Khawaja Asif on Operation Sindoor India-Pakistan Conflict
इस्लामाबाद: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुरूवारी रात्री पाकिस्तानने उत्तर आणि भारतातील सीमेवरील 15 ठिकाणी ड्रोन आणि मिसाईलने हल्ल्याचा प्रयत्न केला.
तथापि, भारताच्या सडेतोड प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी बेताल वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना ते म्हणाले की, "मदरसे किंवा मदरशांतील विद्यार्थ्यांबाबत बोलायचे तर ती आमची सेकंड डिफेन्स लाईन आहे, याबाबत काहीही संशय नाही. गरज पडली तर मदरशातील मुलांचा वापर करू.
मदरशांमध्ये जे तरुण शिकत आहेत, त्यांचा दीनशी संबंध आहे आणि त्याचबरोबर त्यांचा उपयोग नागरी आणि इतर गरजांसाठी 100 टक्के केला जाऊ शकतो."
दरम्यान, ख्वाजा असिफ यांच्या या वक्तव्यातून पाकिस्तानातील मदरशांमध्ये मुलांतून भारतविरोधी विष पेरण्याचे काम केले जात आहे, हे स्पष्ट होत आहे.
भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे पाक सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिमही उद्ध्वस्त झाली आहे.
भारताच्या कारवाईची दहशत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्येही जाणवली, जिथे अनेक खासदारांनी युद्ध न करण्याचा सल्ला दिला आणि एक खासदार तर रडताना दिसला.
पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. यात संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांच्यासारखे शहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेतेही आहेत.
ख्वाजा आसिफ म्हणाले होते की, "जर भारताने हल्ला केला आणि पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर जगात कोणीही उरणार नाही."
हनीफ अब्बासी यांनी म्हटले होते की, "आमच्याकडे गौरी, गजनवीसारख्या क्षेपणास्त्रांसह 130 परमाणु शस्त्रे आहेत आणि ती भारताच्या दिशेने रोखलेली आहेत."
रशियामधील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी एका मुलाखतीत म्हटले की, "जर भारतासोबत युद्ध झाले, तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल."
त्यांनी काही लीक झालेल्या दस्तऐवजांचा उल्लेख करत म्हटले की, "भारत, पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करेल, अशा स्थितीत पाकिस्तान संपूर्ण ताकदीनिशी भारतावर हल्ला करेल."