

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावामुळे किंवा मर्यादेमुळे थांबवले गेले नाही, तर भारताने स्वतःच्या रणनीतीनुसार आणि अटींवर ते थांबवण्याचा निर्णय घेतला, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या लष्करी क्षमतेवर देखील त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर ६ ते १० मे २०२५ दरम्यान पार पडले. या कारवाईत भारतीय सैन्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि प्रभावी रणनीतीचा वापर करत आपली ताकद जगासमोर ठळकपणे मांडली. गरज भासली असती तर भारत दीर्घकालीन युद्धासाठी पूर्णपणे सज्ज होता. “आमच्याकडे ‘पूर्ण क्षमता’ होती. अचानक गरज पडल्यास सैन्यशक्ती आणि संसाधने झपाट्याने वाढवण्याचीही क्षमता होती, तसेच आज भारतीय सैन्य पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले आहे, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले की, या ऑपरेशनदरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि प्रगत मिसाइल प्रणालींचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यामुळे हल्ल्यांची अचूकता वाढली आणि निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान व प्रभावी झाली. भविष्यातील युद्ध तंत्रज्ञानाधारित असेल, याची जाणीव ठेवून भारत सैन्याचे आधुनिकीकरण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांचे आणि जवानांचे कौतुक करत त्यांचा आत्मविश्वास आणि तयारी हीच देशाची खरी ताकद असल्याचे सांगितले.