

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याला भारताने फक्त 15 दिवसांत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय वायुसेनेने मध्यरात्री राफेल लढाऊ विमानांच्या साहाय्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. या मोहिमेत स्काल्प -ईजी मिसाईल आणि हॅमर बॉम्बचा वापर करण्यात आला.
स्काल्प ईजी म्हणजेच स्टॉर्म शॅडो ही लांब पल्ल्याची एअर-लाँच क्रूझ मिसाईल आहे. ही मिसाईल रडारला सुद्धा सहज पकडता येत नाही. कारण, तिचा रडार क्रॉस सेक्शन खूप कमी आहे आणि ती विशेष मटेरियलने बनलेली असते. शिवाय, तिचं इन्फ्रारेड सिग्नेचरदेखील अत्यंत कमी आहे, ज्यामुळे ती अधिक घातक ठरते.
स्काल्प मिसाईलची रेंज जवळपास 560 किलोमीटर आहे. त्यामुळे राफेलला शत्रूच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याचीही गरज भासत नाही. भारताच्या सीमेवरूनच या मिसाईलद्वारे टार्गेट नष्ट करता येते. चारस्तरीय नेव्हिगेशन सिस्टीममुळे ही मिसाईल अचूकपणे हालणार्या गाड्या, बंकर किंवा भूमिगत ठिकाणांनाही लक्ष्य करू शकते.
2016 मध्ये भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली. या जेटमध्ये स्काल्प आणि हॅमर मिसाईलसारखी आधुनिक शस्त्रे बसवलेली आहेत. या ऑपरेशनमध्ये राफेलने आपली ताकद ठळकपणे सिद्ध केली आहे. राफेल जेट 2,222 कि.मी./तास वेगाने उडू शकतो, ज्यामुळे तो कोणत्याही शत्रूसाठी मोठा धोका ठरतो.