

India-Pakistan first war in 1974 to Operation Sindoor
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातेसंबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या दोन शेजारी देशांमध्ये अनेकदा युद्धे झाली. दहशतवादी हल्ले आणि सीमेवर संघर्षही घडले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947 मध्येच भारत-पाकिस्तान संघर्षाची सुरवात झाली होती. तेव्हाच दोन्ही देशांमध्ये पहिले युद्ध झाले होते. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या मुळाशी काश्मीरच्या मालकीचा प्रश्न आहे. या भागासाठी दोघांमध्ये तीन मोठी युद्धे आणि सीमेवरील असंख्या चकमकी झाल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची पाकिस्तानविरूद्धची लेटेस्ट कारवाई. दोन्ही देशांमधील 1947 ते 2025 या दीर्घ कालावधीतील संघर्षावर एक नजर...
भारत-पाक फाळणीनंतर लगेचच 1947 मध्ये पहिले युद्ध झाले. फाळणीनंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. तेव्हा भारताने सैन्य पाठवले. 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धविराम लागू करण्यात आला आणि लाईन ऑफ कंट्रोल (LoC) स्थापन झाली, जी आजही त्या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे.
1965 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर राबवले, ज्यात काश्मीरमध्ये छुपे सैनिक घुसवून बंडखोरी करायची योजना होती. भारताने याला उत्तर म्हणून पूर्ण लष्करी कारवाई सुरू केली. दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शेवटी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला आणि ताश्कंद करार करण्यात आला.
बांगलादेश पूर्वी पाकिस्तानचा भाग होता.तो पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानातील दडपशाहीमुळे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पाठिंबा दिला.
भारताने पूर्व आघाडीवर लष्करी मोहीम सुरू केली आणि हा भाग पाकिस्तानपासून पूर्णपणे तोडून टाकला. त्यातून 16 डिसेंबर 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानने शरणागती स्वीकारली, यामुळे बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र बनले.
या युद्धात भारतीय नौदल व वायूदलाची मोठी भूमिका होती. विशेषतः कराची बंदरावरील हल्ला उल्लेखनीय ठरला.
1999 मध्ये कारगिल युद्ध हे अत्यंत भीषण ठरले. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी उंच पर्वतीय भागांत घुसखोरी केली होती. भारताने ऑपरेशन विजय राबवत ही भूमी परत मिळवली. 26 जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
या युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले आणि अणुयुद्धाच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची लाट उसळली होती.
उरी येथील लष्करी कॅम्पवर हल्ला झाला. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. भारताकडून POK मधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. ही कारवाई भारताच्या प्रतिकारात्मक धोरणात मोठा टप्पा ठरली. तसेच पहिल्यांदाच खुलेआम कारवाईची कबुली भारताने दिली.
2019 च्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळांवर हवाई हल्ला केला. 1971 नंतर ही भारताची पहिली अशा प्रकारची हवाई कारवाई होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तान व पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.
ही कारवाई फक्त 25 मिनिटे चालली आणि 80 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत मुंबई 26/11 हल्ल्याचे नियोजन झालेले स्थळही उद्ध्वस्त करण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एका हल्ल्याचे उत्तर नाही, तर भारताच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा धोरणाचा स्पष्ट संदेश आहे. सातत्याने चालणाऱ्या भारत-पाक संघर्षाच्या इतिहासात हे एक निर्णायक टप्पे ठरेल.