

Char Dham Yatra Helicopter Service Latest Update
डेहराडून : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच दुसरीकडे चारधाम यात्रेबाबत उत्तराखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधून होणारे ड्रोन हल्ले आणि तणावपूर्ण परिस्थिती पाहता चारधाम यात्रेकरूंसाठी सुरू असलेली हेलिकॉप्टर सेवा तातडीने स्थगित करण्यात येत आहे, असे पत्रक उत्तराखंड नागरी हवाई सेवा विकास प्राधिकरणाने (UCADA) काढले आहे.
UCADA ने शनिवारी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, उत्तराखंडमधील चार धाम म्हणजेच यमूनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ या भागात व्यावसायिक वापरासाठी आणि भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा बंद तातडीने बंद करण्यात येत आहे. पुढील सूचनेपर्यंत ही हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यत येत असून आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठीच हेलिकॉप्टर सेवेचा वापर करता येईल. अशा परिस्थितीत फक्त अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठीच ही सेवा उपलब्ध असेल, असंही प्रशासनाने पत्रकात म्हटले आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना बसणार आहे.
भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा मार्गावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. चारधाम येथे तात्पुरते पोलीस ठाणे तात्पुरते पोलीस ठाणे उभारण्यात येत आहे. तसेच यात्रामार्गावर नजर ठेवता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांनी सांगितले.