

Uttarakhand Crime
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील उधम सिंहनगर जिल्ह्यातील खातिमा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैवाहिक जीवनात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीचा गळा चिरून प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचे शीर धडावेगळे करून नाल्यात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. साडेपाच महिन्यानंतर या हत्येचं गुढं उलगडण्यात हरियाणा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रेयसीचे सडलेल्या अवस्थेतील धड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिचे शीर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पूजा मंडल (वय ३२) असे मृत तरूणीचे नाव असून याप्रकरणी मुश्ताक अली याला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
मुश्ताक अली हा पूजाला २०२२ मध्ये रुद्रपूर बस स्टँडवर भेटला होता. त्यानंतर त्याच्यात मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. दोन वर्षापासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणाला मुश्ताक अली याने पूर्णविराम द्यायचे ठरवले. व त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्या मुलीशी लग्न केले. मुश्ताकने लग्न केल्याचे समजाताच पूजा सितागंजला आली. व तिने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देऊन तो तिला आपल्या बहिणीच्या घरी घेऊन आला. त्या ठिकाणी तिला ठेवले. त्यानंतर बोलण्याच्या बहाण्याने त्याने तिला काली पुलिया अंडरपासच्या जवळ बोलवून घेत तिची गळा चिरून हत्या केली. व धड आणि शीर नाल्यात इतरस्त्र ठिकाणी फेकून दिले. चादरीत गुंडाळून टाकलेला कुजलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून शीर अजूनही सापडलेले नाही.
नानकमट्टा येथील बंगाली कॉलनीतील रहिवासी पूजा मंडल ही तिची धाकटी बहीण पुरमिला विश्वास हिच्यासोबत गुरुग्राम (हरियाणा) येथील एका स्पा सेंटरमध्ये काम करत होती. पूजा नोव्हेंबरमध्ये सितारगंज येथे गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या बहिणीने १९ डिसेंबर २०२४ मध्ये आपली बहीण बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. त्यानंतर पोलिसांना एक धागा सापडला व त्यावरून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले. टॅक्सीचालक असणारा सितारगंज येथील रहिवासी मुश्ताक अली याच्याबरोबर पूजाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. सुरूवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साडेपाच महिन्यापूर्वीच पूजाचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याची कबूली दिली. पूजाचे शिर व धड एका नाल्यात फेकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी काली पुलिया अंडरपास येथील नाल्यातून मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील शरीर ताब्यात घेतले आहे. तिचे शीर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.