

Kalyan Crime
बजरंग वाळूंज
डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळील माणी-अटाळी गावात लघुपटाचे शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. गावातील दुकानदार गणेश म्हात्रे (21) या नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित मुलगी आंबवली गावात कुटुंबियांसह राहत असून शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी रात्री आठच्या सुमारास मैत्रिणीकडे जाते असे सांगून ती घरून निघाली. याच दरम्यान काळू नदीच्या किनारी लघुपटाचे चित्रिकरण सुरू होते. उत्सुकतेपोटी ती मुलगी शूटिंग पहायला गेली. याच भागात गणेश म्हात्रे याचे किराणामालाचे दुकान आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानदाराने गोड बोलून बालिकेला आपल्या दुकानात बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबियांनी रात्रभर अटाळी, आंबिवली, आदी भागात शोध घेतला. तथापी मुलगी कुठेही आढळून आली नाही. सकाळच्या सुमारास शोध घेत असताना त्यांना मुलगी घराच्या परिसरात आढळून आली. यावेळी मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आणि खूप थकल्यासारखी दिसत होती. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय हादरले.
कुटुंबियांनी विश्वासात घेऊन विचारले असता काळू नदीच्या किनारी गेले असता एका दुकानदाराने अत्याचार केल्याची माहिती बालिकेने कुटुंबियांना दिली. हे ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आंबिवलीच्या माण-अटाळातील दुकानदार गणेश म्हात्रे याच्या विरूध्द तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या पथकाने वासनांध दुकानदाराला पकडून गजाआड करण्यात आले.