पुढारी ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरचा पठ्ठ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris 2024 Olympics) नेमबाजीत गुरुवारी इतिहास रचला. स्वप्निलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये ‘कांस्य’ पदकावर आपली मोहोर उमटवली. त्याबद्दल त्याचे आज शुक्रवारी लोकसभेत अभिनंदन करण्यात आले आहे. लोकसभेच्या वतीने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल स्वप्निल कुसाळेचे (Swapnil Kusale) अभिनंदन केले.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वप्निल कुसाळे याच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील यशस्वी कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, “स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. कुसाळे यांची ही उत्कृष्ट कामगिरी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.'' यावेळी त्यांनी भारतीय खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरुवारी स्वप्नीलचे अभिनंदन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरिसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे काल संवाद साधला होता. "शाब्बास स्वप्नील, तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस," या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पुरुषांच्या पात्रता फेरीत ५९० गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचलेला मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने अंतिम फेरीत इतिहास रचला. मनू भाकर आणि सरबज्योत सिंगपाठोपाठ स्वप्निल कुसाळे याने भारताला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत थोडक्यात संधी हुकलेल्या कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची ही कसर भरून काढत सर्वांचे स्वप्न पूर्ण केले.