पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) नेमबाजीत आज गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये (50 m Rifle 3P Men's shooting) भारताचा नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने कांस्य पदक जिंकले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीतील हे तिसरे पदक आहे. याआधी नेमबाजीत मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये भारताच्या स्वप्निल कुसाळेला कांस्य.
स्वप्निल कुसाळे राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा.
ऑलिम्पिक पथकात दाखल झालेला महाराष्ट्राचा एकमेव नेमबाज.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे. सध्या भारतीय रेल्वेत पुणे येथे टीसी म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्निलने यंदाच्या ऑलिम्पिकसाठी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत कसून सराव केला होता. योगा व जिमचाही त्याच्या दैनंदिनीत आवर्जून समावेश राहिला. तांदळाची भाकरी, मेथीची भाजी हा आवडीचा आहार असणार्या स्वप्निलने सात-आठ वर्षे नाशिकमध्ये सराव केला. दीपाली देशपांडे यांचे त्याला प्रशिक्षण लाभत आहे.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता नववीत असताना पहिले राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकले होते, तेव्हाच त्याने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते, अशी माहिती स्वप्निलचे वडील आणि कौलव केंद्रशाळेचे प्रमुख सुरेश कुसाळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. स्वप्निलचे पदकाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा ठाम विश्वास स्वप्निलच्या मातोश्री आणि कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील लोकनियुक्त सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी स्वप्निल फायनलमध्ये पोहोचल्यानंतर व्यक्त केला होता.