Omar Abdullah : मंत्रिमंडळ विस्तारानंतर CM ओमर अब्दुल्लांसमोर मोठं संकट; २१ आमदार 'नाराज', खासदारही देणार राजीनामा!

नाराज आमदारांनी घेतली कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी बैठक
Omar Abdullah cabinet expansion rebellion
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला.
Published on: 
Updated on: 

Omar Abdullah cabinet expansion rebellion : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) आमदारांमधील असंतोष वाढत चालला आहे. शुक्रवारी नाराज असलेल्या २१ आमदारांनी माजी मंत्री आणि आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. दरम्यान, श्रीनगरचे खासदार आगा रुहुल्ला मेहदी यांनी ३ नोव्हेंबर रोजी पक्षाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा 'एक्स' पोस्ट करत केली आहे. त्यामुळे 'एनसी'त खळबळ उडाली आहे.

'नाराज' आमदारांची मागणी काय?

नाराज आमदारांनी अशी सूचना केली आहे की, दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या मंत्र्यांना बदलून इतर आमदारांना संधी दिली जावी. तसेच जूनमध्ये श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या बैठकीत घेतलेले निर्णय लागू करण्यात यावे. आमदार नझीर गुरेझी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती लवकरच पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन हे ठराव त्यांच्यासमोर मांडणार आहे.

Omar Abdullah cabinet expansion rebellion
Omar Abdullah : "माझा बाप कोण आहे..."ची ही नवी आवृत्ती; 'आम्ही Gen Z आहोत' व्‍हायरल व्हिडिओवर CM ओमर अब्दुल्ला भडकले!

आगा रुहुल्ला ३ नोव्हेंबरला देणार खासदारकीचा राजीनामा

नॅशनल कॉन्फरन्सचे बंडखोर नेते आणि खासदार आगा रुहुल्ला यांनी ३ नोव्हेंबर रोजी पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर, बंडाची आग अधिक पसरू नये म्हणून पक्षाचे नेतृत्व नाराज आमदारांची आणि रुहुल्ला यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Omar Abdullah cabinet expansion rebellion
Omar Abdullah on PoK : "...तर पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन झाला असता": जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा दावा

ओमर अब्दुल्लांनी मंत्रिमंडळात चार नवीन मंत्र्यांचा समावेश

मंगळवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, ज्यामध्ये चार नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला, तर सतीश शर्मा यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. ज्या आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, त्यापैकी अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजौरी-पुंछ भागातील आमदारांनीही सहभाग घेतला होता. थन्नामंडीचे आमदार मुझफ्फर इक्बाल खान यांनी यापूर्वीच आपल्या मतदारसंघाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. या बैठकीला पुंछ-हवेलीचे आमदार एजाज जान आणि बुढालचे आमदार जावेद इक्बाल चौधरी देखील उपस्थित होते.

बंडखोर नेते आगा सय्यद रुहुल्लांकडून सभेचे आयोजन

बंडखोर नेते आगा सय्यद रुहुल्ला यांनी ३ नोव्हेंबर रोजी एका रॅलीचे आयोजन केले असून, त्यांनी लोकांना मंगळवारी बडगाममधील उपायुक्त कार्यालयाजवळ येण्याचे आवाहन केले आहे. रुहुल्ला यांची नाराजी, बडगाम पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या पराभवामागचे एक प्रमुख कारण ठरली होती. आता रुहुल्ला आपली लोकसभा जागाही सोडण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, श्रीनगर संसदीय मतदारसंघातील पोटनिवडणूक नॅशनल कॉन्फरन्ससाठी एक मोठे आव्हान ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Omar Abdullah cabinet expansion rebellion
US Envoy in Kashmir | जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचे श्रीनगरमध्ये मोठे विधान

मुबारक गुल यांना सरचिटणीस पदावरून हटवले

फारुख अब्दुल्ला यांनी मुबारक गुल यांना सरचिटणीस पदावरून हटवले. नाराज आमदारांच्या २१ सदस्यांच्या बैठकीनंतर, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी मुबारक गुल यांना पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटवले आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे गुल नाराज होते. त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यांना हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता एनसीमधील आमदारांची नाराजी अधिक चिघळणार की नाराजी नाट्यावर पडदा पडणार, हे पुढील काही दिवस स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.