

Ajit Doval on Operation Sindoor
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने आज (दि.७) पहाटे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील आपल्या समकक्षांना माहिती दिली. तसेच भारताची पुढील भूमिकाही स्पष्ट केली.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत बुधवारी अजित डोवाल यांनी विविध देशांच्या त्यांच्या समकक्षांना सांगितले की, "भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल माहिती देताना अजित डोवाल यांनी म्हटलं आहे की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही; परंतु पाकिस्तानने तणाव वाढवण्याचा किंवा भारतावर हल्ला करण्याची आगळीक केल्यास त्याला दृढतेने प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत."
भारताने बुधवारी पहाटे पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. अवघ्या २५ मिनिटांमध्ये पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे दहशतवाद्याचे तळांवर हल्ला केला. या कारवाईनंतर अजित डोवाल यांनी तत्काळ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, ब्रिटनचे जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे मुसैद अल ऐबान, युएईचे महामहिम शेख तहनौन आणि जपानचे मसाताका ओकानो यांच्याशी चर्चा केली. तसेच रशियन एनएसए सर्गेई शोइगु, सीपीसी सेंट्रल कमिटीच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि पीआरसीचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल बोन यांचे राजनैतिक सल्लागार यांच्याशीही संपर्क स्थापित करण्यात आला," असे अधिकाऱ्याने सांगितले. येत्या काळात डोवाल त्यांच्या समकक्षांच्या संपर्कात राहतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने आज पहाटे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या धडक कारवाईने पाकिस्तानची झोड उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरने धडकी भरल्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आता शुद्धीवर आले आहेत. भारताच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर काही तासांतच 'ब्लूमबर्ग' टीव्हीशी बोलताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही तणाव कमी करण्यास तयार आहे. आम्ही गेल्या पंधरवड्यापासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतेही शत्रुत्वाचे पाऊल उचलणार नाही; परंतु जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.' जर भारताने माघार घेतली तर आपण निश्चितच हा तणाव कमी करू.