

Bharat Taxi
नवी दिल्ली : १ जानेवारीपासून दिल्लीत 'भारत टॅक्सी' अॅपचे अधिकृत लाँचिंग होणार असून, प्रवाशांना विश्वसनीय, सुरक्षित आणि परवडणारी कॅब सेवा देण्याचा दावा करण्यात आला आहे. वेगाने डिजिटल होत असलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात हे अॅप एक 'देशी पर्याय' म्हणून आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज आहे. सरकारच्या पुढाकाराने सुरू होत असलेली ही सेवा ओला आणि उबेर सारख्या खासगी कंपन्यांना पर्याय म्हणून पाहिली जात आहे.
भारत टॅक्सी हे एक मोबाईल आधारित कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, जे इतर कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर्सप्रमाणेच स्मार्टफोनवरून ऑपरेट करता येईल. सामान्य भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन याची रचना करण्यात आली आहे. ही सेवा 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह' अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. ड्रायव्हर्सच्या हक्कासाठी काम करणारी ही जगातील पहिली नॅशनल मोबिलिटी को-ऑपरेटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. हे अॅप स्थानिक आणि आऊटस्टेशन अशा दोन्ही प्रवासांसाठी सेवा देईल.
भारत टॅक्सी सेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना ओला आणि उबरच्या वाढीव किंमतींपासून मुक्तता मिळेल. गर्दीच्या वेळी किंवा खराब हवामानात मनमानी भाडेवाढीच्या समस्येपासून लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारत टॅक्सीचे भाडे पूर्व-निर्धारित आणि पारदर्शक असेल.
भारत टॅक्सी अॅप ड्रायव्हर-फ्रेंडली मॉडेलवर चालेल. असा दावा केला जातो की चालकांना भाड्याच्या 80 टक्क्यांहून अधिक रक्कम मिळेल. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना कोणत्याही अतिरिक्त दबावाशिवाय चांगली सेवा देता येईल. अनेकदा खासगी टॅक्सी कंपन्यांच्या मनमानीमुळे कॅब चालक त्रस्त असल्याचे दिसून येते, त्यावर हा एक उपाय ठरेल.
लाँचिंगपूर्वीच दिल्लीत सुमारे ५६ हजार ड्रायव्हर्सनी भारत टॅक्सी अॅपवर नोंदणी केली आहे. हा आकडा ड्रायव्हर कम्युनिटीमध्ये या प्लॅटफॉर्मबद्दल असलेला उत्साह दर्शवतो. सुरुवातीपासूनच प्रवाशांना पुरेशी वाहने उपलब्ध होतील, अशी आशा सरकारला आहे.
भारत टॅक्सी अॅपवर प्रवाशांना ऑटो, कार आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही सुविधा मिळतील. यामुळे कमी अंतरापासून ते लांबच्या प्रवासापर्यंत प्रत्येक गरजेसाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. नवीन वर्षात दिल्लीच्या रस्त्यांवर हे देशी अॅप किती प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत टॅक्सी अॅपमध्ये रिअल-टाइम ट्रॅकिंग, २४x७ ग्राहक समर्थन, रोख आणि डिजिटल पेमेंट पर्याय आणि सुरक्षा फीचर्स यासह अनेक प्रगत वैशिष्ट्ये असतील. ही कॅब सेवा कुटुंब प्रवासी, कॉर्पोरेट वापरकर्ते आणि पर्यटकांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे सर्व विभागांसाठी उत्कृष्ट अनुभव मिळेल.
भारत टॅक्सी मोबाइल अॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर चाचणी आणि अभिप्रायासाठी उपलब्ध आहे. सहकारी कंपनीचे म्हणणे आहे की अॅपची iOS आवृत्ती देखील लवकरच लाँच केली जाईल. सध्या, दिल्ली आणि गुजरातमध्ये चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर भारत टॅक्सी ड्रायव्हर या नावाने प्रदर्शित केले आहे. अॅप डाउनलोड करताना ते 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' द्वारे जारी केलेले आहे याची खात्री करून घ्यावी.