

नवी दिल्ली : पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम चालवली जात आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित इंधनाबद्दल बरीच चर्चा झाली. याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ते सोशल मीडियावर पैसे देऊन केलेल्या राजकीय मोहिमेचे बळी ठरले आहेत.
इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याविरुद्ध लॉबिंग केले जात आहे. काही स्वार्थी लोक हा बदल थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. त्यात कोणतेही तथ्य नव्हते, असेही ते म्हणाले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
E- २० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) बद्दल सोशल मीडियावर वाढत्या चिंतेवर बोलताना गडकरी म्हणाले की, सर्वत्र लॉबी आहेत, हितसंबंध गुंतलेले आहेत. दरम्यान, ई२० एप्रिल २०२३ मध्ये निवडक पेट्रोल पंपांवर सुरू करण्यात आले होते. एप्रिल २०२५ मध्ये ते देशभरात लागू करण्यात आले.
इथेनॉलयुक्त पेट्रोलबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आयात केलेल्या कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठीच्या व्यापक धोरणाचा हा भाग आहे. आमची आयात २२ लाख कोटी रुपयांची आहे. आपल्याला स्वतःच्या ताकदीने भारताची उभारणी करायची आहे, हा कार्यक्रम केवळ उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठीच नाही तर ऊस आणि धान्यावर आधारित इथेनॉलची मागणी वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी देखील डिझाइन केला आहे, असेही ते म्हणाले.