

Nitin Gadkari on current politics India
नागपूर: आज लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो तो सर्वाधिक चांगला नेता ठरतो. बोलणे सोपे, करणे कठीण आहे. मी त्याची वेळोवेळी अनुभूती घेतो. मी ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे मनापासून खरे बोलण्याची मनाई आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले.
अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हातर्फे भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या 805 व्या अवतरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरेश भट सभागृहात ते बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले की, येथे हौसे, गवसे, नवसे सारेच आहेत. मात्र भगवान कृष्णाने लिहून ठेवले आहे की, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट आहेत. शॉर्टकटने माणूस लवकर पुढे जातो. नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर सिग्नल मोडून पुढे जावे लागते. मात्र, शॉर्टकट तुमचे करिअर शॉर्ट करतो, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी एकप्रकारे विरोधकांना दिला. कथनी आणि करणीत अंतर नको, मी खोटे बोलणार नाही आश्वासन देणार नाही. मला कोणी मते दिली नाही तरी चालेल. मी खोटे आश्वासन देणार नाही. जे मनात असेल तेच तोंडात असेल. पटलं तर पटलं नाही पटलं तर नाही पटलं. चर्चा केल्याशिवाय मी आश्वासन देणार नाही असेही सांगितले.
भगवान चक्रधर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर गडकरी यांनी यावेळी भर दिला. महान व्यक्तींच्या विचारातून आपण प्रभावित होऊन आपल्या जीवनात काम करतो. आपले दोष कमी करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. जीवनमूल्य काय आहे ते आकाशातून पडले नाही. धार्मिक ग्रंथ, प्रवचनातून आलेले आहेत. माणसात आणि दगडात फरक आहे. दगडात बदल होत नाही. दगडावर कितीही तबला पेटी वाजवली तरी काही उपयोग होत नाही. दगडाला कधीच आनंद होत नाही. व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही.
आमदार, खासदाराचा पोरगा खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री, काही कार्यकर्ते म्हणतात आम्ही काय करावे, मी म्हणतो घंटा निवडणूक चिन्ह घ्या आणि वाजवा, सर्व पक्षात हेच सुरू आहे. कोणाचा मुलगा असावे हे चुकीचे नाही. मात्र जनतेने निवड केली पाहिजे. सामाजिक व्यवस्थेत बदल करावेत. शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. भूतकाळातील इतिहास, वर्तमानातील अनुभव आणि भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञानातून एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज व्यक्त केली.
सरकार कुठल्याही पार्टीचे असो, मंत्र्यांच्या गळ्यात हार घालत जा आणि काम करून घेत जा, मात्र आपल्या पंथ,संप्रदायात त्यांना दिसू देऊ नका, धर्मकारण, राजकारण, समाजकारण दूर ठेवले पाहिजे.आम्ही जिथे घुसलो तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. गादीसाठी झगडे, मग कमिशन नेमतो आणि नंतर स्टे देतो. शेवटी राजा नाही धर्म श्रेष्ठ या वास्तवाकडे लक्ष वेधले. डिजिटल स्वरूपात लीळाचरित्र परदेशी पोहोचले पाहिजे असे आवाहन केले. आधुनिकीकरण आणि पाश्चातीकरण या दोन गोष्टीत फरक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये असेही सांगितले.