

Nitin Gadkari On Two Wheeler Toll Tax
नवी दिल्ली : दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिले. याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे नितीन गडकरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन म्हटले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देखील दुचाकीवर टोल कर लादण्याच्या बातम्या खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले.
केंद्र सरकार १५ जुलैपासून दुचाकी वाहनांवर देखील टोल कर आकारणार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. सोशल मीडियावर देखील याबाबत चर्चा झाली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली. दरम्यान, ही सर्व माहिती खोटी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले.
ते म्हणाले की, काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट देणे सुरूच राहील. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवण्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. एनएचएआयने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, दुचाकी वाहनांवर टोल शुल्क आकारण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही. सर्व माहिती खोटी असल्याचे एनएचएआयने म्हटले.