

Arunachal flash floods
अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. येथे पूर आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग १३ च्या बाना-सेप्पा भागात शुक्रवारी रात्री उशिरा भूस्खलन झाले. यात दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पूर्व कामेंग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कामदाम सिकोम यांनी सांगितले की, बिचोम डिस्ट्रिक्टच्या बाना येथून सेप्पाच्या दिशेने वाहन जात असताना अचानक भूस्खलन झाले. यामुळे वाहन खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पण मुसळधार पाऊस, पुन्हा झालेले भूस्खलन आणि रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडथळे आले. तरीही पोलिस आणि बचाव पथकांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले.
"शनिवारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. अनेक तासांच्या अथक शोधकार्यानंतर, महामार्गापासून सुमारे १५० मीटर खोल दरीत सर्व सातही जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण बाना येथील किचांग गावातील रहिवासी होते," असे सिकोम यांनी सांगितले.
अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका वेगळ्या घटनेत, झिरो-कामले रस्त्यालगतच्या शेतात भूस्खलन झाल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना वाचवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
आसाममध्येही मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. येथे गेल्या २४ तासांत भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला. येथील सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे १० हजार लोक प्रभावित झाले आहेत, असे शनिवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत बुलेटिनमधून सांगण्यात आले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून (ASDMA) सांगण्यात आले आहे की, कामरूप जिल्ह्यात पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.