

श्रीनगर : पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहे. बुधवार २३ एप्रिलपासूनच एनआयए बैसरन खोऱ्यात शोधमोहिमेसाठी तळ ठोकून आहे. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी पुरावे शोधण्याचे काम तीव्र केले आहे, या संदर्भातील वृत्त 'ANI' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
NIA च्या पथकामध्ये दहशतवादविरोधी यंत्रणेचे एक आयजी, एक डीआयजी आणि एक एसपी यांचा समावेश आहे. हे पथक शांत आणि रमणीय बैसरन खोऱ्यात त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला भयानक हल्ला पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक घडवून आणणाऱ्या घटनांचा क्रम एकत्रित करण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची बारकाईने चौकशी केली जात असल्याचे माहिती एनआयए अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीचे संकेत मिळविण्यासाठी तपास करणाऱ्या NIA (एनआयए) पथकांकडून प्रवेश आणि निर्गमन बिंदूंची बारकाईने तपासणी केली जात आहे. फॉरेन्सिक आणि इतर तज्ञांच्या मदतीने पथके, देशाला हादरवून टाकणाऱ्या भयानक हल्ल्याला कारणीभूत असलेल्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यासाठी पुराव्यांसाठी संपूर्ण परिसराची कसून तपासणी करत आहेत, असे देखील एनआयएने म्हटले आहे.