

नवी दिल्ली: आपण वापरत असलेली उत्पादने शाकाहारी घटकांपासून बनली आहेत की नाहीत, याची माहिती ग्राहकांना ठळकपणे कळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पॅकेजिंग नियमामध्ये केलेल्या सुधारणेनुसार आता साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि प्रसाधने (टॉयलेटरीज) यासारख्या उत्पादनांवर शाकाहारी घटकांपासून बनलेल्या उत्पादनांसाठी ‘हिरवा ठिपका’ आणि मांसाहारी घटकांपासून बनलेल्या उत्पादनांसाठी ‘लाल किंवा तपकिरी ठिपका’ असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हे चिन्ह पॅकेजच्या मुख्य दर्शनी भागावर (प्रिन्सिपल डिस्प्ले पॅनेल) सर्वात वरच्या बाजूला लावणे आवश्यक आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाने ‘लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) फोर्थ अमेंडमेंट रुल्स, २०२६ (चौथा सुधारणा नियम) अधिसूचित केले आहेत.
या नियमामुळे ‘लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रुल्स, २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित नियमांनुसार, नियम ६ मध्ये एक नवीन उपकलम समाविष्ट करण्यात आले आहे.
ज्यामध्ये साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, इतर सौंदर्यप्रसाधने आणि प्रसाधने यांच्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मांसाहारी घटकांपासून बनलेल्या उत्पादनांवर ‘लाल किंवा तपकिरी ठिपका’ असेल. तर, शाकाहारी घटकांपासून बनलेल्या उत्पादनांवर ‘हिरवा ठिपका’ असेल.
नवीन पॅकेजिंग नियम काय सांगतो?
या अधिसूचनेद्वारे, विद्यमान नियमांमध्ये कलम ६(४ए)(डी) [६(४ए)(डी)] समाविष्ट करण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, रंगीत ठिपका हा पॅकेज केलेल्या उत्पादनाच्या मुख्य दर्शनी भागावर (प्रिन्सिपल डिस्प्ले पॅनेल) सर्वात वरच्या बाजूला असणे आवश्यक आहे.
हा भाग म्हणजे उत्पादनावरील मुख्य जागा असते, जिथे अनिवार्य माहिती प्रदर्शित केली जाते. या नियमावलीत वैयक्तिक निगा राखणारी उत्पादने आणि सौंदर्यप्रसाधने जसे की, साबण, शॅम्पू आणि टूथपेस्ट तसेच इतर सौंदर्यप्रसाधने आणि प्रसाधने यांचा समावेश होतो.
नवीन नियम कधी लागू होईल?
ही सुधारणा २१ सप्टेंबर २०२६ रोजी राजपत्रात (गॅझेट) अधिसूचित करण्यात आली असून त्यात हे नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून लागू होतील, असे म्हटले आहे.