Amit Shah | ‘जनादेशाचा दुरुपयोग केला नाही’! संविधान बदलण्याच्या आरोपावर अमित शहांचे उत्तर

गृहमंत्री अमित शहा
गृहमंत्री अमित शहा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या संविधानात बदल करण्यासाठी भाजपला लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकायच्या असल्याचा विरोधकांचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावलाय. भाजपला गेल्या दशकभरात संविधानात बदल करण्यासाठी जनादेश होता, मात्र आम्ही तसे केले नाही. लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट हे देशात राजकीय स्थिरता आणण्यासाठी आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी ANI वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

"गेल्या १० वर्षांत आम्हाला संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे जनादेश होता, पण आम्ही तसे कधीच केले नाही. राहुल बाबा आणि त्यांची कंपनी जे काही म्हणेल आणि देशातील जनता त्यावर विश्वास ठेवेल असे तुम्हाला वाटते का? या देशाने आम्हाला स्पष्ट जनादेश दिलाय. देशातील जनतेला आधीच माहित आहे की मोदी यांच्याकडे संविधानात बदल करण्यासाठी पुरेसे बहुमत आहे. पण आम्ही तसे केले नाही," असे शहा म्हणाले.

भाजपला ४०० जागा का हव्या आहेत?

"आम्हाला देशातील राजकारणात स्थैर्य आणण्यासाठी आम्हाला लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकायच्या आहेत. आम्हाला आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि ज्यांना अजून लाभ मिळणे बाकी आहे अशा काही गरीब लोकांना लाभ मिळवून आम्हाला ४०० जागा हव्या आहेत. प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचणे बाकी आहे. देशात नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात खूप काम करायचे आहे. आम्हाला ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्यासाठी आम्हाला ४०० जागा हव्या आहेत" असे ते पुढे म्हणाले.

राहुल गांधींचा आरोप काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. एका राजकीय पक्षाने त्यांच्या निवडणूक प्रचारात कथितपणे वचन दिले आहे, जर ते निवडणूक जिंकले तर ते संविधान बदलतील. "पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने म्हटले आहे की, ते सत्तेवर आले तर ते संविधान हटवतील. या संविधानाने भारतातील गरीब, मागास, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, मजूर यांना अधिकार दिले आहेत. आणि आज भाजपचे बडे नेते म्हणतात की जर ते निवडणुकीत जिंकले तर ते संविधानच बदलून टाकतील," असे राहुल गांधी यांनी १५ मे रोजी ओडिशातील बालंगीर येथे जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले होते. राहुल गांधी यांचे हे आरोप अमित शहा यांनी फेटाळून लावले आहेत.

'भाजप स्वतःचा विस्तार करणार नाही का?'

"आम्हाला एका मोठे पाऊल उचलण्यासाठी ४०० जागांची गरज नाही; आम्ही आता ते करू शकतो. कोणीही त्यांच्या कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणार नाही का; भाजप स्वतःचा विस्तार करणार नाही का?" असे सवाल शहा यांना केले आहे.

'इंदिरा गांधींच्या काळात बहुमताचा दुरुपयोग'

इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील तत्त्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधत शहा म्हणाले, "पाहा, बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही. पण इंदिरा गांधींच्या काळात बहुमताचा दुरुपयोग केल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. त्यांनी कलम बदलले. लोकसभेचा कालावधी वाढवला गेला. त्यांनी आणीबाणी लादली आणि १.५ लाख लोकांना विनाकारण १९ महिने तुरुंगात टाकले. आम्ही कधीही बहुमताचा दुरुपयोग केला नाही. राहुलबाबांना कोणीही गांभीर्याने घेत नाही." असा टोला त्यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त करत अमित शहा म्हणाले की, देशात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे.

'मोदींच्या नेतृत्त्वात तिसऱ्यांदा स्थिर सरकार स्थापन होणार'

"या लोकांना देशात अस्थिर सरकार हवे आहे. एक स्थिर सरकार देशासाठी काय करू शकते हे जनतेने पाहिले आहे. देशातील तरुणांनी ३० वर्षांपासून अस्थिर सरकारचा त्रास सहन केला आहे. पीएम मोदींच्या नेतृत्त्वाखालील स्थिर सरकार दोन वेळा सत्तेत आले आणि आता तिसऱ्यांदा स्थिर सरकार स्थापन होईल. त्यामुळे देशातील जनता मोदीजींच्या या ध्येयासोबत आहे," असेही ते पुढे म्हणाले.

केजरीवाल यांच्याविषयी काय म्हणाले अमित शहा?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनावर तुरुंगातून नुकतेच बाहेर आले. यावर बोलताना अमित शहा म्हणाले, "मतदार म्हणून मला विश्वास आहे की ते जिथे जातील तिथे लोकांना मद्य घोटाळा आठवेल… क्या लोगों को तो बडी बोतल दिखाई पडेगी."

कलम ३७० रद्द, श्रीनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढला

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात आधीच्या १४ टक्क्यांवरून आता जवळपास ४० टक्क्यांपर्यंत वाढलेले मतदान हे कलम ३७० रद्द करण्याच्या यशाचा सर्वात मोठा पुरावा असल्याचा दावाही अमित शहा यांनी केला आहे. "कलम ३७० रद्द करण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, भूतकाळातील १४ टक्क्यांवरून (श्रीनगरमध्ये) ४० टक्क्यांपर्यंत वाढलेला मतदानाचा टक्का हा या निर्णयाचे यश आहे." असे त्यांनी नमूद केले.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news