

NEET UG
नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेनंतर, नीट-युजी परीक्षेसंबंधित सुधारणांच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच या संदर्भातील एका उच्चस्तरीय समितीच्या शिफारसींवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षापासून ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची घोषणा आधीच झाली असली, तरी आता परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांत व टप्प्यांत घेणे, एकूण प्रयत्नांची संख्या आणि कमाल वयोमर्यादा निश्चित करणे यासारख्या आमूलाग्र बदलांचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या या शिफारशींबाबत आरोग्य मंत्रालय लवकरच अंतिम निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी, पुढच्या वर्षापासून नीट-युजी परीक्षा जरी ऑनलाईन घेतली जाणार असली, तरी इतरही अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या अधिकाऱ्यांनी काही माहिती सादर केली. त्यांनी २०२४ च्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेनंतर डॉ. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींची माहिती दिली. या समितीने नीट परीक्षेतील सुधारणांबाबत आरोग्य मंत्रालयाकडे तीन मुख्य सूचना सादर केल्या होत्या, असेही त्यांनी समितीला सांगितले.
परीक्षा ऑनलाइन करावी, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी परीक्षा अनेक सत्रांमध्ये आणि टप्प्यांमध्ये आयोजित करावी, परीक्षेत बसण्याची कमाल वयोमर्यादा आणि एकूण प्रयत्नांची संख्या निश्चित करावी, अशा शिफारशी समितीने केल्या होत्या. एनटीएकडून या शिफारसींच्या मंजुरीसाठी मंत्रालयाकडे नवीन प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सध्या नीट परीक्षेसाठी किमान वय १७ वर्षे असणे अनिवार्य आहे, परंतु कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट नाही. तसेच एक विद्यार्थी कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतो. यामुळे दरवर्षी तब्बल २२ ते २३ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात, ज्यामध्ये ५ ते ६ वेळा परीक्षा देणाऱ्यांची संख्या मोठी असते. सूत्रांच्या माहितीनुसार, वयाची आणि प्रयत्नांची मर्यादा निश्चित केल्यास दरवर्षी येणाऱ्या अर्जांचा आकडा कमी होईल, ज्यामुळे पारदर्शकता आणणे सोपे होईल.
उच्चस्तरीय समितीने अभियांत्रिकीसाठीची 'जेईई मेन' आणि 'नीट-युजी' या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा एकत्र घेण्याचाही प्रस्ताव दिला आहे. मात्र, शिक्षण क्षेत्रात हा निर्णय लागू करणे आव्हानात्मक मानले जात आहे. कारण, ११ वी आणि १२ वी मध्ये गणित आणि जीवशास्त्र हे दोन्ही विषय ठेवून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी ज्या क्षेत्रात चांगली रँक मिळेल तिथे प्रवेश घेणे सोपे जाते. त्यामुळे या प्रस्तावावर एनटीए सध्या केवळ विचार करत आहे.