CJP Protest Manoj Jarange : ‘तुम्ही ही जागा सोडली, तर सरकार आंदोलन मोडून काढेल!’ : मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांना पाठिंबा, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची घेतली भेट
CJP Protest Manoj Jarange Patil Warns Protesters Targets Government Over Agitation
Published on
Updated on

नवी दिल्ली : ‘जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा का ही जागा सोडलीत, तर हे आंदोलन सरकार मोडून काढेल,’ असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. बुधवारी मनोज जरांगे-पाटील दिल्ली दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी जंतर-मंतरवर जाऊन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह इतर आंदोलकांशी संवाद साधला.

जंतर-मंतरवर बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी येथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या मुलांवर अन्याय करते. पुढील काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उगारला, तर सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही."

आपल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचा संदर्भ देत जरांगे-पाटील म्हणाले, "तिकडेही गोरगरीब मुलांवर, महिलांवर आणि वृद्धांवर प्राणघातक हल्ला केला गेला होता. आमच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलनाचे स्थळ सोडू नये, अशी विनंती मी करतो. संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे."

'माझे हिंदी एवढे चांगले नाही' - जरांगे-पाटील

मनोज जरांगे-पाटील जेव्हा मंचावर बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. या वेळी अभिजीत दिपके त्यांच्या भाषणाचे हिंदीत भाषांतर करून सांगत होते. काही आंदोलकांनी आणि उपस्थितांनी जरांगे-पाटील यांना हिंदीतून बोलण्याचा आग्रह केला. यावर, "माझे हिंदी इतके व्यवस्थित नाही. मी जर हिंदीत बोलायला लागलो, तर तुमची हिंदी तुम्ही विसरून जाल," अशी मिश्किल टिप्पणी जरांगे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याने जंतर-मंतरवरील वातावरण काहीसे हलके-फुलके झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news