

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई हे सदैव केंद्रस्थान राहिले. १८५७ च्या उठावावेळी मरीन बटालियनचे सैयद हुसेन आणि मंगळ गडिया या वीरांनी प्राणाची आहुती दिली. पुढे भगतसिंह, सुखदेव आणि महाराष्ट्राचे सुपुत्र राजगुरु यांनी दिलेले बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महाराष्ट्राच्या गौरवशाली योगदानाचा सविस्तर आढावा मांडला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, लोकमान्य टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी समाजाला संघटित केले आणि आजही हा उत्सव अनेक संघटनाचा आधार आहे. महात्मा गांधींनी मुंबईतून “भारत छोडो” आंदोलनाची हाक दिली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली आणि उषा मेहता यांच्या योगदानामुळे मुंबई केवळ आर्थिक राजधानी नव्हे तर स्वातंत्र्य आंदोलनाची राजधानी होती, असेही त्या म्हणाल्या. त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गोपाल गणेश आगरकर यांसारख्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आवश्यक अशी सामाजिक पायाभरणी केली, याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पेशव्यांचे पराक्रम, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाईंचे योगदानाचे स्मरण डॉ. गोऱ्हे यांनी केले. इतिहासातील या पराक्रमी गाथा केवळ स्मरणापुरत्या मर्यादित ठेवायच्या नाहीत, त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.