

सोलापूर : चिंचोळी (ता. मोहोळ) येथील गर्भवती आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करून न्याय द्यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
चिंचोळी येथील आशाराणी भोसले या तीन महिन्यांच्या गरोदर विवाहितेने पतीसह सासरच्या मानसिक छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. चारचाकी गाडी आणि पैशासाठी केलेल्या छळास वैतागून आशाराणी हिने आत्महत्या केल्याचे तिच्या आईवडिलांचे म्हणणे आहे.
या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल उपसभापती डॉ. गोर्हे यांनी घेतली. त्यांनी तातडीने सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लगेचच सोलापुरात घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत डॉ. गोर्हे यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला सखोल आणि निष्पक्ष तपासाचे स्पष्ट निर्देश दिले.
ही आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या याचा तपास वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पद्धतीने करावा. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल आणि गळफास लावण्याच्या स्थितीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे आणि जलदगतीने तपास करून न्याय दिला जावा, अशी आग्रही भूमिका डॉ. गोर्हे यांनी घेतली.