

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांच्या एकत्रिकरणाबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’ ही आमची भूमिका आहे. तरीही एकत्रिकरण झाल्यास खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागतच करु. मात्र, याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारच घेतील, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवायच्या की स्वतंत्र याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजित पवार घेतील. शक्य नसल्यास शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरेल, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
उपसभापती डॉ. गोर्हे गुरुवारी अहिल्यानगर जिल्हा दौर्यावर आल्या असता त्यांनी ऊसतोडकामगार, महिला अत्याचार आदींबाबत जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोर्हे म्हणाल्या की, महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. यामध्ये महिलांचे सकारात्मक मतदान होते. त्यांचे मनोगत समजावून घेण्यासाठी तसेच शिवसेना महिला आघाडीचे प्रश्न समजावून घेण्यासाठी दौरा सुरु आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारच सोडवतील. एकत्रिकरण झाल्यास खासदार सुप्रिया सुळे यांचे आम्ही स्वागतच करु, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
या निवडणुका एकत्रित लढविण्याबातचा निर्णय तीनही पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेतील. पक्ष वाढीसाठी सर्वच पक्षांना प्रयत्न करावे लागत आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. आवश्यकता वाटल्यास स्वतंत्रपणे देखील निवडणूक लढवली जाईल असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
लाडक्या बहिणीबाबत विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. विधानसभेत त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार करीत ते महिलांचा अपमान करीत असल्याची टीका डॉ. गोर्हे यांनी विरोधकांवर केली.
कुटुंबात महिला त्रास देतात अशा पुरुषांच्या तक्रारी येतात. हे खरे असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्रांत समुपदेशनासाठी एखादा वार राखीव ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.