

Spying for Pakistan : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या नौदल कर्मचारी विशाल यादव याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे. तो सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिला हँडलरच्या संपर्कात राहून तिला भारतीय नौदल संबंधित महत्त्वाची सामरिक माहिती पुरवत होता. यादवला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते. या व्यसनाच्या आहारी जावून आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने संवेदनशील माहिती देण्यास सुरुवात केली. क्रिप्टोकरन्सीद्वारे आर्थिक व्यवहार करत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, विशाल यादव हा मुळचा हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील पुनसिका येथील रहिवासी आहे. तो नौदलाच्या डॉकयार्ड संचालनालयात अपर विभागात वरिष्ठ श्रेणी लिपिक (युपर डिव्हिजन क्लर्क) पदावर कार्यरत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. राजस्थान सीआयडी इंटेलिजन्स विभागाची त्याच्या हालचालींवर लक्ष होते. त्याला शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ अंतर्गत अटक करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस महानिरीक्षक (CID सुरक्षा) विष्णूकांत गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव डॉकयार्ड संचालनालयात कार्यरत होता. तो सोशल मीडियावर प्रिया शर्मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका पाकिस्तानी महिला हँडलरच्या नियमित संपर्कात होता. तिने त्याला नौदल मोहिमांमधील अत्यंत महत्त्वाची सामरिक माहिती देण्याच्या बदल्यात पैशांचे आमिष दाखवले होते. यादवला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते. या व्यसनाच्या आहारी जावून आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने संवेदनशील माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये (USDT मध्ये) आणि बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले होते.
पोलिसांनी सांगितले की, यादवच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक विश्लेषणात चॅट रेकॉर्ड्स आणि कागदपत्रांसह अनेक ठोस पुरावे सापडले आहेत. यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही त्याने नौदलाची संवेदनशील माहिती उघड केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यावरून तो दीर्घकाळापासून हेरगिरीत सामील असल्याचे स्पष्ट होते. सध्या जयपूरमधील एका सुरक्षित ठिकाणी अनेक गुप्तचर यंत्रणांकडून यादवची कसून चौकशी सुरू आहे. अधिकारी आता या प्रकरणात इतर संभाव्य साथीदारांना ओळखण्यावर आणि माहितीच्या गळतीची व्याप्ती तपासण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा एजन्सींनी नागरिकांसाठी एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे. यामध्ये सोशल मीडियावर सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती संपर्कात आल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.