

Iran Israel Ceasefire
इस्रायलची गुप्तहेर संस्था 'मोसाद'साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने तिघांना फाशी दिली आहे, असे वृत्त मिझान वृत्तसंस्थेने दिले आहे. इस्रायल- इराणमधील १२ दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदी प्रस्तावावर सहमती दर्शवली. त्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी इराणने तिघांना फासावर लटकवले.
मिझानच्या वृत्तानुसार, इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादला मदत करणे आणि एका व्यक्तीच्या हत्येसाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांची तस्करी केल्याबद्दल तिघांना दोषी ठरवण्यात आले होते. पण याबाबत अधिक काही माहिती पुढे आलेले नाही.
तसेच इस्रायलशी संबंध असल्याबद्दल ७०० जणांना अटक करण्यात आली आहे, असे वृत्त इराण सरकारशी संलग्न असलेल्या नूरन्यूजने वृत्त दिले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यात अनेक दशके संघर्ष सुरु आहे. इराणने मोसादशी संबंध असल्याबद्दल आणि पश्चिम आशियाई देशांमध्ये इस्रायली गुप्तचर संस्थेच्या कारवायांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अनेक व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली आहे.
दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अण्विक ठिकाणांवर बॉम्बहल्ला केला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली. त्याला इस्रायल आणि इराणने सहमती दर्शवली. दरम्यान, युद्धबंदीच्या उल्लंघनाबद्दल इराण आणि इस्रायल यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारत नाराजी व्यक्त केली.