

Espionage Case
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर आणखी एका युट्यूबवर कारवाई करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी युट्यूबर जसबीर सिंग याला अटक केली आहे. जसबीर सिंग हा रूपनगरमधील महालन गावचा रहिवासी आहे. त्याच्याशी संबंधित हेरगिरी नेटवर्कचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. ही कारवाई मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने केली आहे, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिली.
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, मोहाली येथील राज्य विशेष ऑपरेशन्स सेलने रूपनगर येथील माहलन गावातील रहिवासी जसबीर सिंग याच्याशी संबंधित असलेल्या एक हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला. 'जान महल' नावाचे युट्यूब चॅनल चालवणारा जसबीर सिंग याचा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग असलेल्या पीआयओ शाकीर उर्फ जुट रंधावा याच्याशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्याचा हरियाणा येथील सध्या अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशीही जवळचा संपर्क होता.
या प्रकरणी तपासात असेही आढळून आले आहे की, जसबीर दानिशच्या निमंत्रणावरून तीन वेळा (२०२०, २०२१, २०२४) दिल्लीतील पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. तिथे तो पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला होता. तो २०२०, २०२१, २०२४ मध्ये असे तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये अनेक पाकिस्तानमधील नंबर दिसून आले आहेत. ज्याची आता तपशीलवार फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
जसबीर सिंग हा भारतीय नागरिक आहे. तो 'जान महल' नावाचे युट्यूब चॅनल चालवतो. पाकिस्तानी हस्तकांसाठी काम करणाऱ्या अनेक मूळ भारतीय व्यक्तींशी घनिष्ठ संबंध असल्याचा जसबीर सिंग याच्यावर आरोप आहे. पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, सिंग याचे हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली हरियाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हकालपट्टी केलेला पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.