

Navjot Singh Sidhu wife on Punjab politics
चंडीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. मात्र त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू राजकारणात परतणार का, या प्रश्नावर खल सुरु झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनीही राजकारणात परणार असल्यचे संकेत दिले आहेत. मात्र एक अटही त्यांनी काँग्रेस पक्षासमोर ठेवली आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत. जो ५०० कोटींची सूटकेस देतो, तो मुख्यमंत्री बनतो, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नासह विविध प्रश्नांवर पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या की, "काँग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांना पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यास, ते सक्रिय राजकारणात परततील. माझे पती काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत, सध्यात ते चांगले पैसे कमावत आहेत आणि आनंदी आहेत."
नवज्योत कौर सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसमधील "अंतर्गत गटबाजी" कडेही लक्ष वेधले. मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा बाळगून असलेले पाच नेते आधीच पंजाब काँग्रेसमध्ये आहेत आणि ते सिद्धूंना पुढे येऊ देणार नाहीत. इतकी गटबाजी असताना, मला वाटत नाही की ते, नवज्योत सिद्धू यांना पुढे येऊ देतील, कारण आधीच पाच मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत आणि ते काँग्रेसला पराभूत करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पक्षाच्या हायकमांडने हे समजून घेतले, तर ते वेगळे प्रकरण आहे, असे स्पष्ट करत त्यांनी पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीकडे लक्ष वेधले.
नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या की, माझ्या पतीकडे कोणत्याही पक्षाला देण्यासाठी पैसे नाहीत; पण ते पंजाबचे सुवर्ण राज्य मध्ये रूपांतर करू शकतात. आम्ही नेहमी पंजाबसाठी बोलतो; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत. कोणी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती का, असे विचारले असता, त्या म्हणाल्या की, कोणीही त्यांच्याकडे मागणी केली नाही; पण जो ५०० कोटींची सूटकेस देतो, तो मुख्यमंत्री बनतो.
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. यानंतर लोकसभा निडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघात र सिद्धू यांचा 'आप'चे नवखे उमेदवार जीवनज्योत कौर यांच्याकडून पराभव झाला होता.