

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि शिखर संस्थेतर्फे ‘गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण कार्यक्रम केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या २१ पैकी १० पुरस्कार महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांना जाहीर झाले. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. सदर कार्यक्रम येत्या १० ऑगस्टला राजधानी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला देशभरातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक तसेच साखर- इथेनॉल विषयाशी संबंधित मंत्री आणि साखर क्षेत्राशी संबंधित केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे, या कार्यक्रमासोबतच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून त्यानंतर साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये साखर उद्योगातील तज्ज्ञ हे वर्तमान आणि भविष्यातील प्रश्नांचा वेध घेतील, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०२२-२३ या वर्षासाठी एकूण २१ पुरस्कार जाहीर केले. एकूण २१ पुरस्कारांपैकी महाराष्ट्राने एकूण १० पुरस्कारांसह पहिला तर उत्तर प्रदेशने चार पुरस्कारांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुजरात, तामिळनाडू यांना प्रत्येकी दोन तर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे.
यावर्षी (२०२२-२३) देशातील ९२ सहकारी साखर कारखान्यांनी गुणवत्ता पुरस्कारासाठी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र (३८), उत्तर प्रदेश (११), गुजरात (११), तामिळनाडू (१०), पंजाब (८), हरियाणा (८), कर्नाटक (४) आणि मध्य प्रदेश आणि उत्तराखंड (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते. पुरस्कार योजनेच्या धोरणानुसार, देशातील उच्च साखर वसुली (किमान १० टक्के सरासरी) असलेल्या महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांचा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखानदार सहभागी झाले होते. राज्यांचा दुसरा गट उर्वरित (सरासरी पुनर्प्राप्ती १० टक्क्यांपेक्षा कमी) पासून तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांचा समावेश होता.
- उत्तम ऊस उत्पादकता/उच्च उत्पन्न विभाग
प्रथम : क्रांतिकारक डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकारी कारखाना (पो, कुंडल, जिल्हा पलूस, जिल्हा सांगली, महाराष्ट्र)
द्वितीय: लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना (सुंदरनगर. माजलगाव, जि. बीड, महाराष्ट्र)
प्रथम: श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना (माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र)
दुसरा: श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना (जुन्नर आंबेगाव, निवृत्ती नगर जि. पुणे, महाराष्ट्र)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (गंगामाईनगर-पिंपळनेर, माढा, जि. सोलापूर, महाराष्ट्र)
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित मोहनराव कदम नगर, वांगी, कडेगाव, जि. सांगली (महाराष्ट्र)
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (कागल, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र)
प्रथम: जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना. (हुपरी-यलगुड, तालुका – हातकणंगले, जिल्हा. कोल्हापूर, महाराष्ट्र)
दुसरा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना (यशवंतनगर, तालुका – कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र)