

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार करण्यात आला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे.
या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून 12 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
1 एप्रिल 2019 पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणार्यांना / हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी 26 रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा 308 रूपये वैद्यकीय भत्ता दिला जाईल.
स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा मिळेल तसेच अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
सरकारच्या या निर्णयाने कामगारांचे हित जपले असून सर्व कामगार आणि कारखान्यांमधील कर्मचार्यांमध्ये एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होईल. राज्यातील सर्व साखर कारखान्यातील कामगारांची दिवाळी गोड झाल्याबात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले.