

Narendra Modi record
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे 'सर्वाधिक काळ प्रमुख' म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर आज त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत.
या कामगिरीसह पंतप्रधान मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा सर्वाधिक काळ 'प्रमुख'पद भूषविण्याचा ( ८,९३० दिवस) विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान असा दोन्ही कार्यकाळ मिळून मोदींनी हा टप्पा गाठला असून, आता त्यांनी सत्ताप्रमुख म्हणून आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण विक्रमांची नोंद झाली आहे. यामध्ये ते गुजरातचे सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्यमंत्री आहेत. तसेच स्वतंत्र भारतात जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. तसेच २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून त्यांनी आपले राजकीय वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. सलग १३ वर्षांहून अधिक काळ राज्याचे नेतृत्व केल्यानंतर, २१ मे २०१४ रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी त्यांनी भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पूर्ण बहुमतासह सत्तेत येणारे ते पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरले, तसेच दोन कार्यकाळ पूर्ण करून तिसऱ्यांदा सलग सत्तेत परतण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पंतप्रधान मोदींचे वर्चस्व कायम आहे. त्यांच्या YouTube चॅनेलने ३ कोटी (३० दशलक्ष) सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला असून, जागतिक नेत्यांमध्ये ते आघाडीवर आहेत. Instagram वर १० कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेले ते जगातील पहिले सक्रिय नेते ठरले आहेत. सध्या त्यांचे १०.१ कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर १०.६ कोटी फॉलोअर्ससह त्यांनी आपले जागतिक स्थान अधिक भक्कम केले आहे.