

PM Narendra Modi 75th birthday
रमेशभाई मेहता संघपरिवारातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते. विश्व हिंदू परिषद , सेवा भारती अशा संस्थांचे प्रमुख पदाधिकारी राहिलेले मेहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या पत्नी किर्तीदा या मोदींच्या मानलेल्या भगिनी. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या मेहता दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या दाट स्नेहबंधाच्या अविस्मरणीय आठवणी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘पुढारी’च्या मल्टीमिडीया संपादक मृणालिनी नानिवडेकर यांना सांगितल्या. भाऊरायाच्या भावबंधाच्या या आठवणी किर्तीदा यांच्याच शब्दांत...
मुंबईतल्या जुहूतली एक शांत सदनिका. अनेक ऐतिहासिक निर्णयांचे साक्षी असणारे आमचे घर... पूर्वी मध्यमवर्गीयांची तुरळक वस्ती असलेल्या या भागातल्या या सदनिकेने एक जिताजागता इतिहास घडताना पाहिला . नंतर आख्यायिका ठरलेली अन् भारताच्या राजकारणाला वळण देणारी घटना येथे घडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पायरव असलेल्या घरात सरसंघचालक असलेल्या बाळासाहेब देवरसांना भेटायला त्यांच्या निरोपानुसार घाईघाईने दोघेजण आले. मधुभाई कुळकर्णी आणि नरेंद्र मोदी. दोघेही संघाचे प्रचारक , या घराशी परिचित.नरेंद्र मोदी तर मुंबईत आले की हमखास या घरात मुक्काम करणारे पण आज मात्र काही वेगळेच सुरु होते. दोघेही देवरस होते त्या खोलीत गेले.बराच खल झाला असावा . बाहेर येताच मधुभाई आणि नरेंद्रभाई माझ्या यजमानांना येतो पुन्हा म्हणत निरोप घेवू लागले . यजमान आणि मी दोघेही ‘जेवून जा’ सांगायला दरवाजाकडे गेले .“आज नाही , पुन्हा कधीतरी.. ”म्हणत दोघेही निघून गेले. गुजरातेत प्रचारक असलेले मोदी असे न जेवता ,नेहमीप्रमाणे गप्पा न मारता ,मुलींची चौकशी न करता का गेले याचे कोडे पडले होते आम्हाला .’ एकदोन दिवसांनी गुजरातच्या कुठल्याशा वर्तमानपत्रात बातमी झळकली : नरेंद्र मोदी आता संघातून भाजपात!
नरेंद्र मोदी माझे मानलेले भाऊ असल्याने मी दरवर्षी या प्रचारक बंधुरायाला राखी बांधत असे. त्यामुळे मी फारच संतापले. नरेंद्रभाईंनी राजकारणात जाणे मला अजिबात पसंत नव्हते. आवेशात मी विचारत होती फोनवर, ‘हे का केलेत?’ मोदीजींनी शांतपणे उत्तर दिले! “निर्णय झालाय. मी आदेशाचे पालन करतोय” !
मोदींचा राजकारणातला असा प्रवेश कालांतराने थेट देशाचे नेतृत्व करणारा ,पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास असेल हे आम्हा दोघांना अगदी संघाच्या महत्वाच्या पदाधिकार्यांना माहिती तरी असेल का त्या वेळी ? राजकारणात काम करा हा त्या दिवशीचा निरोप भारतात पुढे घडलेल्या किंबहुना वर्तमानात घडत असलेल्या इतिहासाची नांदी होता. हे साल 1986 असावे ...!
त्या पूर्वीही अनेकदा मोदी मुक्कामी असत. आमच्या घरी मोदी पहिल्यांदा पोहोचले ते आणिबाणीच्या काळाच्या आसपास .1977 चे वर्ष कदाचित. जुलमी निर्णयाच्या विरोधात संघ परिवार उभा झाला होता ,अन्य विचारांची मंडळीही समवेत होतीच .संयुक्त लढा कसा असेल याची आखणी सुरु होती. 1978 च्या कुठल्याशा दिवशी मोदी सर्वप्रथम आमच्याकडे आले ते चिठ्ठी घेवून. ती पाहून त्यांना आत घेतले गेले. संघाच्या पदाधिकार्यांशी त्यांची भेट ठरली होती .बंद दरवाजाआड काहीतरी चर्चा झाल्या.धावपळ करत आलेले मोदी इतके थकले होते की बाहेरच्या सोफ्यावर अडचणीच्या छोट्याशा कोचावर गाढ झोपीही गेले लगेच .दुसर्या दिवशी सकाळी थोड्या गप्पाटप्पा झाल्या अन मोदी मेहता यांचे मैत्र जुळले.ते आजवर कायम आहे. आमच्या त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत . त्यामुळे प्रेम अबाधित आहे .
अशाच एका प्रवासातल्या मुक्कामात भयंकर आक्रीत घडले. गुजरातेत मोरबी धरण फुटले. हाहा:कार उडाला. साल 1979. मोदी नेमके मुंबईत आमच्या घरी होते . त्यांना जायचे होते दिल्लीत . ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडींना भेटायचे होते .मोरबीची दुर्घटना स्वस्थ बसू देत नव्हती .दिल्लीतली दोन दिवसांनंतरची ठेंगडी भेट पण खूप महत्वाची होती . काय करावे ठरलेली भेट की मदतकार्यात उतरणे ? मोदी अस्वस्थ होते . आम्ही सुचवले ठेंगडीची भेट आधी होतेय का बघा .ती होवून जावू द्या मग गुजरातला जा. तोवर बाकी स्वयंसेवक मदतकार्य करतील.भेट पूर्वीच्या तारखेच्या आधी घेण्यास ठेंगडी हो म्हणाले पण जायचे कसे ? यजमान म्हणाले, ‘मी विमानाचे तिकीट काढून देतो.तुम्ही जा’ .प्रचारकांचे असे खर्च संघाचे अभिभावक करतात .पण त्या काळी 440 रुपये असलेले विमानाचे तिकीट आव्हान होते. माझ्यासाठीही ही रक्कम त्याकाळी मोठी होती ,अर्थात मोदींना हा पैसा उभारणे गैरसोयीचे होते. शक्य नव्हते.अखेर त्यांनी मी तिकीट काढून दिले तर विमानाने प्रवास करणे मान्य केले .तो मोदींचा पहिला हवाईप्रवास . आज पहा कुठेकुठे जाताहेत विमानाने. मग दिल्लीतले काम आटोपून ते मोरबीकडे पोहोचले.तेथे त्यांनी केलेले मदतकार्य केवळ शब्दातीत आहे.
1986 च्या सुमारास संघाच्या आदेशानुसार भाजपमध्ये राजकीय काम करु लागलेले मोदीजी 1989 पर्यंत राजकारण समजून घेत होते. संघटना बांधणे ,तंत्रस्नेही होणे हे त्यांचे आवडते काम होते. अहमदाबाद म्हणजे कर्णावतीत महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला निर्णायक यश मिळवून दिल्यानंतर मोदींनी राजकारणात कधीही मागे पाहिले नाही .ते मुंबईत आमच्याकडेच वास्तव्याला असत . मुंबईतले माझे घर म्हणत हक्काने .ते भाजपचे सरचिटणीस असताना योगायोगाने आम्ही एकाच वेळी लंडनला होतो.तिथे संगणक मोबाईल असे काही काही विकत घेतले आणि मी बाजुला ठेवून दिले पण नरेंद्रभाई दिवस दिवस ध्यास लागल्यासारखे ते समजून घेत होते. हे तंत्रप्रेम आजच्या डिजीटल गव्हर्न्सन्सचे बीज होते. एकदा असेच आम्ही माऊंट अबू परिसरात वसिष्ठाश्रम बघायला गेलो तेंव्हा आमची तिसरी सर्वात धाकटी मुलगी शची अगदी लहान होती . या आश्रमाला पायर्या खूप.पण तिला कडेवर घेवूनच मोदींनी सगळा वेळ पालकत्व स्वत:कडे घेतले. तिलाही त्यांच्याच कडेवर बसायचे होते ! एका राखीपौर्णिमेला ते मुंबईत घरी होते.मी त्यांना राखी बांधली तेव्हापासून दरवर्षी रक्षाबंधनात भेट झाली नाही तर राखी जाते अन् पत्र येते .पंतप्रधान झाले त्यावर्षी किर्तीदा भाजप महिला कार्यकारिणीतल्या भगिनींचे नेतृत्व करत राखी बांधायला गेल्या. सगळे यथासांग झाले . दुसर्या दिवशी लगेच फोनवरुन विचारणा झाली : ‘बेन तुमचा हात इतका का कापतोय ? थरथरतोय की ! मी सांगतोय तुमचा भाऊ की डॉक्टरकडे जा’.पंतप्रधानाने असे लक्ष ठेवणे मला लोकविलक्षण वाटते.
शचीच्या,धाकट्या मुलीच्या , लग्नात निरोपाची वेळ आली तेव्हा नरेंद्रभाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नरेंद्रभाई मोठे होत होते. आम्ही हरिद्वारला 2001 साली एका शिबीरात असताना विश्वेश्वरानंद महाराजांनी सांगितले की तुमचे मित्र गुजरातचे मुख्यमंत्री होताहेत .आम्हाला आनंद झाला पण ते आमचे क्षेत्र नव्हते . दुसर्या दिवशी नरेंद्रभाईंनी स्वत:च फोन केला .कानावर आले का काही विचारताच मी हो म्हणालो ,शपथविधीला यायचेय सगळ्यांनी असे निमंत्रण देत आमच्या तिथल्या मुक्कामाची सोय पण त्यांनी कानावर घातली . मुख्यमंत्री झाल्यावर सुरक्षा कारणांनी आमच्या घरचा मुक्काम संपला पण प्रेम मात्र तेवढेच. आजार वगैरेत वास्तपुस्त.
आज मोदीजी देशाचे नेते झाले आहेत.जग कौतुकाने बघतेय .त्यांच्या शिफारशीने ना आमच्या मुलींना ना काही मिळाले ना मोदींच्या पुतणीपुतण्यांना . ते समाजातल्या प्रत्येकाचे आहेत. देशवासीयांच्या कुटुंबांची चिंता करतात .त्यांना देव उदंड आयुष्य देवो . . . आम्ही दोघेही वयाने त्यांच्यापेक्षा मोठे.त्यामुळे वयाच्या मोठेपणामुळे आशीर्वाद देवू !