

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीतील सुधारणांसाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह मनसेच्या नेत्यांनी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. तब्बल अडीच तास शिष्टमंडळाला ताटकळत बसावे लागले. त्यानंतर भेट झाली. मात्र, आयोग काहीच गांभीर्याने ऐकून घ्यायला तयार नव्हता, अशी संतप्त भावना शिष्टमंडळातील नेत्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत सुधारणा व्हावी, सुधारित नवीन मतदारयादी प्रसिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, यासह 9 मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्या. या शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, काँग्रेसचे अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजीवकुमार झा उपस्थित होते.
शिष्टमंडळाने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त विवेक जोशी, सुखविंदरसिंग संधू यांची भेट घेतली. तत्पूर्वी, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यांना भेट नाकारली गेली. त्यानंतर त्यांनी आयोगातच ठिय्या मांडला. यानंतर आयोगाने मंगळवारी भेटीची वेळ दिली होती. येथेही सर्व नेत्यांना एकत्र भेटण्यासाठी आयोगाने नकार दिला. आम्ही फक्त दोनच प्रतिनिधींना भेटू, अशी भूमिका निवडणूक आयुक्तांनी घेतली. त्यानंतर अनिल देसाई यांनी सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना भेट द्या, अशी मागणी केली. आयोगाने ती पुन्हा नाकारली. त्यानंतर संपूर्ण शिष्टमंडळाने जोपर्यंत भेट देणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशी भूमिका घेतली. तब्बल अडीच तास ताटकळत ठेवल्यानंतर आयोगाने या शिष्टमंडळाला भेट दिली.
साधारणत: अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर आमचा भ्रमनिरास झाल्याचे मत शिष्टमंडळातील नेत्यांनी व्यक्त केले. खा. अरविंद सावंत म्हणाले की, आम्ही सगळे मुद्दे त्यांना सांगितले; मात्र ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले; मात्र गोपनीयतेचे कारण सांगून ते दिले नाही, असेही ते म्हणाले.
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये नवीन मतदारांची नावे नोंदवली गेली आणि काही नावे वगळली गेली. याचा सकारण तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध करावा. व्हीव्हीपॅट सुसंगत ईव्हीएम उपलब्ध नसतील तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, आदी नऊ मागण्या आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.