

शिक्रापूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापुरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या चाकण चौकातील खड्ड्यांमध्येच बसून भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता राहुल कदम यांनी आंदोलनस्थळाला थेट देत खड्डे बुजविण्यासह डांबरीकरणालाही प्रारंभ केला.(Latest Pune News)
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीला सर्वाधिक कारणीभूत ठरलेल्या चाकण चौकात चाकणहून येणार्या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. शिक्रापूरकरांनी याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या, बैठका केल्या; मात्र गेल्या महिनाभरात बांधकाम खात्याकडून या खड्ड्यांसाठी काहीच उपाययोजना झालेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता पाचंगे यांनी काही कार्यकर्त्यांसह येथील चाकण चौकात ठिय्या मांडला. शिक्रापूर पोलिसांकडून तत्काळ दखल घेतली गेली आणि पोलिस फौजफाटा येथे उपस्थित करण्यात आला. या दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता राहुल कदम हे देखील या ठिकाणी पोहचले व त्यांनी पाचंगे यांचेसमवेत चर्चा केली.
संबंधित रस्ता हा देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे असून मूळ रस्त्याची मालकी ही एमएसआरडीसी यांचेकडे असल्याचे कदम यांनी सांगितले. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 60 कोटींच्या निधीला नुकतीच मंजुरी मिळाली असून कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले; मात्र पाचंगे हे खड्ड्यांतून उठायलाच तयार नसल्याने अखेर कदम यांनी त्यांच्या स्तरावरच या चौकातील 400 ते 500 मीटर हद्दीतील सर्व खड्डे तत्काळ बुजवून डांबरीकरण करण्यासाठी तत्काळ सर्व यंत्रणा, मजूर व डांबर-खडीची मशिनही मागावून घेतली. यानंतर पाचंगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या वेळी सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, अखिल भारतीय ग््रााहक पंचायतीचे गणेश डफळ, सचिन जाधव, गुलाबराव पवार, बंटीशेठ पवार, मंगेश सासवडे, भूमाता बिगेडच्या मंगल सासवडे, सतीश सासवडे, ॲड. प्रवीण कर्डिले, पंढरीनाथ गायकवाड, सुरेश खुरपे, संतोष चौरसिया आदी उपस्थित होते.