

Jail Romance Turns into Wedding: राजस्थानच्या तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांची प्रेमकहाणी आता लग्नापर्यंत पोहोचली आहे. प्रिया सेठ आणि हनुमान प्रसाद हे दोघंही हत्या प्रकरणात दोषी ठरलेले असून सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, दोघांचं तुरुंगात असताना प्रेम जुळलं आणि आता त्यांच्या लग्नासाठी राजस्थान हायकोर्टाने 15 दिवसांची ‘इमरजन्सी पॅरोल’ मंजूर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रिया आणि हनुमान यांचं लग्न शुक्रवारी 23 जानेवारी 2026 रोजी अलवरमधील बडौदामेव येथे होणार आहे. हत्या प्रकरणातील दोन कैदी लग्नबंधनात अडकणार असल्याने हा विषय सध्या चर्चेत आहे.
या दोघांची ओळख आणि जवळीक ओपन जेलमध्ये वाढल्याचं सांगितलं जात आहे.
ओपन जेलमध्ये काही प्रमाणात कैद्यांना काम आणि दैनंदिन गोष्टींसाठी मोकळीक मिळते. त्यामुळे दोघांचा संपर्क वाढला आणि ते गेल्या सुमारे एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रिया सेठ ही पूर्वी मॉडेल होती. 2018 मध्ये जयपूरमध्ये एका तरुणाच्या अपहरण आणि खुनाच्या प्रकरणात ती मुख्य आरोपी होती. माहितीनुसार, प्रियाने एका तरुणाला फ्लॅटमध्ये बोलावून खंडणी वसुलीचा कट रचला होता. नंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून त्या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि ती तेव्हापासून शिक्षा भोगत आहे.
हनुमान प्रसादवर पाच जणांच्या हत्येचा आरोप होता. माहितीनुसार या प्रकरणात एका महिलेसोबत झालेल्या वादातून त्याने कट रचला आणि एका कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातही न्यायालयाने हनुमान प्रसादला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी हायकोर्टात पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर संबंधित समितीच्या अहवालानंतर आणि सुनावणीनंतर हायकोर्टाने 15 दिवसांची पॅरोल मंजूर केली. पॅरोल म्हणजे शिक्षा सुरू असतानाही काही ठराविक कारणासाठी (उदा. लग्न, आजारपण, अंत्यसंस्कार) कैद्याला काही दिवसांसाठी बाहेर राहण्याची परवानगी मिळते.