

T20 World Cup India: T-20 वर्ल्ड कप 2026 आधी टीम इंडियाने जोरदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या T-20 मालिकेत नागपूरच्या पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांनी कीवी संघाला रोखून धरत सामना सहज जिंकला. पण विजय मिळूनही टीम इंडियामध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसली ती म्हणजे, कमकुवत फील्डिंग. आणि हीच चूक पुढच्या सामन्यांमध्ये तसेच वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी अडचण ठरू शकते.
नागपूरच्या सामन्यात भारताने तब्बल 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 190 धावांपर्यंतच पोहचला आणि भारताने 48 धावांनी सामना जिंकला. हा फरक आणखी मोठा असू शकला असता, पण भारताच्या फील्डर्सनी काही वेळा अगदी महत्त्वाच्या संधी गमावल्या. त्यामुळे न्यूझीलंडचे काही फलंदाज जास्त वेळ मैदानात राहिले.
या सामन्यात टीम इंडियाने एकूण 3 कॅच सोडले आणि 2 रनआऊटच्या संधीही गमावल्या. विशेषतः न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्सने घाम फोडला. त्याला लवकर बाद करण्याची चांगली संधी भारताकडे होती. पण एक सोपा रनआऊट चुकल्यामुळे फिलिप्सला जीवदान मिळालं. तो शेवटी 78 धावा करून बाद झाला.
फिलिप्सखेरीज मार्क चॅपमनलाही भारताकडून एक जीवदान मिळालं. तो तेव्हा कमी धावांवर खेळत होता, पण त्यानंतर त्याने चांगली खेळी केली. तसंच डॅरिल मिचेलला तर सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोन वेळा जीवदान मिळालं. सामना जरी भारताच्या हातात होता, तरी अशा चुका मोठ्या स्पर्धेत फार महाग पडू शकतात.
फील्डिंगची ही अडचण फक्त या एका सामन्यातली नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या आधीच्या वनडे मालिकेतही भारताची फील्डिंग कमकुवत दिसली होती. T20 वर्ल्ड कप जास्त लांब नाही. भारत घरच्या मैदानावर स्पर्धा खेळणार असल्याने ट्रॉफीचा दावेदार मानला जातो. पण जर कॅच सुटले, रनआऊट मिस झाले, तर मोठ्या सामन्यांत एका-दोन चुका केल्या तर सामना फिरू शकतो.
त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये आणि वर्ल्ड कप आधी फील्डिंग सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. फील्डिंग कोच आणि टीम मॅनेजमेंटवर ही मोठी जबाबदारी असेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताने मोठा सामना जिंकला, पण फील्डिंगमधील चुका पुन्हा समोर आल्या. 3 कॅच आणि 2 रनआऊटच्या संधी गमावल्याने काही फलंदाज जास्त वेळ खेळले. हीच कमकुवत बाजू T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताला महागात पडू शकते.