

Shashi Tharoor
भारताने पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडे पाडण्याची तयारी केली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकार आता पाकिस्तानची पोलखोल करणार आहे. यासाठी मोदी सरकारने ७ सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर त्याचा बदला म्हणून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी हे शिष्टमंडळ महत्त्वाच्या देशांना भेटी देईल. मोदी सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांचे नावदेखील आहे. पण काँग्रेसने सादर केलेल्या यादीत शशी थरूर यांचे नव्हते. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असून याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या सरकारच्या प्रस्तावित शिष्टमंडळांसाठी काँग्रेसने (INC) चार खासदारांची नावे सादर केली आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी शनिवारी सांगितले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये रमेश यांनी स्पष्ट केले, "काल सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांसाठी काँग्रेसला ४ खासदारांची नावे सादर करण्यासासाठी सांगण्यात आले होते."
काँग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या यादीत माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नासीर हुसेन आणि लोकसभेतील खासदार राजा ब्रार या चारजणांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, जयराम रमेश यांच्यामते काँग्रेसकडून सादर केलेल्या यादीत तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांचे नाव नव्हते.
या शिष्टमंडळात विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. पण सरकारने अमेरिकेत जाऊन देशाची भूमिका मांडण्याची कमान शशी थरूर यांच्याकडे सोपवली आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शिष्टमंडळातील खासदारांची नावे जाहीर करताना, "सर्वात महत्त्वाच्या क्षणी, भारत एकजूट दाखवतो" यावर भर दिला. "सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार देशांना भेट देतील. भारताचे दहशतवादाबाबत झिरो-टोलेरन्स धोरण असून हा आमचा संदेश जगभर पोहोचला जाईल. राजकारणाच्या पलीकडे, मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचे एक शक्तिशाली प्रतिबिंब आहे," असे रिजिजू यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
शशी थरुर (काँग्रेस)
रविशंकर प्रसाद (भाजप)
संजय कुमार झा (जेडीयू)
बैजयंत पांडा (भाजप)
कनिमोझी करुणानिधी (डीएमके)
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना)
या दरम्यान, शशी थरूर यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले, ''अलिकडीच्या घटनांबद्दल आपल्या देशाची भूमिका मांडण्यासाठी पाच प्रमुख राजधान्यांच्या शहरांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी मला भारत सरकारने आमंत्रित करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. जेव्हा देशहिताचा प्रश्न येतो आणि माझी तिथे आवश्यकता असेल तेव्हा मागे राहणार नाही.''